६० डॉक्टरांचे राजीनामे
By Admin | Updated: August 5, 2016 21:13 IST2016-08-05T21:13:15+5:302016-08-05T21:13:15+5:30
ग्रामीण भागात ११ हजार रुपये आणि शहरी भागात १४ हजार अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या १०८ आपातकालीन सेवेतील डॉक्टरांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या दुर्लक्षामुळे

६० डॉक्टरांचे राजीनामे
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. ५ : ग्रामीण भागात ११ हजार रुपये आणि शहरी भागात १४ हजार अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या १०८ आपातकालीन सेवेतील डॉक्टरांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय घेत १०८ सेवतील जिल्ह्यातील ६० डॉक्टरांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत़ परंतु हे राजीनामे विभागीय व्यवस्थापकांनी न स्विकारता कार्यालयातूनच काढता पाय घेतला़ असे असताना शनिवारपासून कामावर न जाण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे़.
१०८ ही आपातकालीन रुग्णवाहिका नांदेड जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी सुरु झाली़ बीव्हीजी कंपनीमार्फत चालविणाऱ्या येणाऱ्या सेवेत नांदेड जिल्ह्यात एकुण २५ रुग्णवाहिका देण्यात आल्या़ या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यात २० हजार रुग्णांचे प्राण वाचविण्यात आले आहेत़ परंतु नादुरुस्त वाहने, डॉक्टरांना अपुऱ्या सोयीसुविधा, तुटपुंजे मानधन याबाबत सेवेतील कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन केले आहे़ परंतु प्रत्येकवेळी आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली़ त्यामुळे आता शेवटचा निर्णय घेत सेवेतील कार्यरत ६५ जणांपैकी ६० डॉक्टरांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत़ शुक्रवारी सायंकाळी हे सर्व डॉक्टर राजीनामे देण्यासाठी डॉग़ुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयातील १०८ सेवेच्या कार्यालयात पोहचले़ या ठिकाणी त्यावेळी विभागीय व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक दोघेही उपस्थित होते़
परंतु त्यांनी या डॉक्टरांचे सामुहिक राजीमाने न स्विकारता कार्यालयातूनच काढता पाय घेतला़ त्यात शनिवारी हे सर्व डॉक्टर जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्याकडे राजीनामे देणार असून सकाळपासूनच ते कामावर उपस्थित राहणार नाहीत़ त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी वरदान ठरणारी १०८ ही आपातकालीन सेवा जिल्ह्यात शनिवारपासून कोलमडणार आहे़.
सेवेतील डॉक्टरांना नियुक्तीपत्रक, पगार पत्रक, प्रोव्हीजनल फंड मिळावा, बी़व्ही़जी़एऩएच़एम़ यांच्या करारातील ईएमएसओच्या निर्देशाची मानधनाबाबत प्रत द्यावी, सर्व डॉक्टरांना किमान २५ हजार रुपये वेतन द्यावे, मासीक वेतन दोन महिन्यात एकदा न करता दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत देण्यात यावे, सर्व डॉक्टर व पायलट यांचा आरोग्य व अपघात विमा काढण्यात यावा, आंतरजिल्हा रेफर कॉल रद्द करावे, रुग्णवाहिकेची दुरुस्ती वेळेवर करण्यात यावी, नर्सिंग कर्मचारी द्यावेत, कमांडो डॉक्टरांचे भत्ते देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यास मेडीकोची नियुक्ती करावी आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत़
शनिवारी सकाळी आयुर्वेदीक महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून प्रशासनाने या विषयावर तोडगा काढवा अशी आमची मागणी आहे़ आमच्या राजीनाम्यामुळे १०८ ही सेवा कोलमडणार असली तरी, जनतेला वेठीस धरण्याचा आमचा कुठलाही उद्देश नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ़प्रशांत मेरगेवाड यांनी स्पष्ट केले़