रस्त्यावर सोडलेल्या वाहनांना 48 तासांची मुदत, टोइंग वाहनांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:00 IST2017-12-11T17:00:15+5:302017-12-11T17:00:40+5:30
मुंबई- रस्त्यावर सोडलेली बेवारस वाहनं वाहतूक कोंडीच नव्हे तर डासांच्या उत्पत्तीसही कारणीभूत ठरत आहेत. अशी सात हजार वाहनं महापालिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये उचलून सुमारे २० एकर जागा मोकळी केली आहे.

रस्त्यावर सोडलेल्या वाहनांना 48 तासांची मुदत, टोइंग वाहनांच्या संख्येत वाढ
मुंबई- रस्त्यावर सोडलेली बेवारस वाहनं वाहतूक कोंडीच नव्हे तर डासांच्या उत्पत्तीसही कारणीभूत ठरत आहेत. अशी सात हजार वाहनं महापालिकेने गेल्या दोन वर्षांमध्ये उचलून सुमारे २० एकर जागा मोकळी केली आहे. ही कारवाई अधिक वेगाने करण्यासाठी पालिका प्रशासनाने दहा टोइंग वाहन तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 48 तास एखादे वाहन रस्त्यावर उभे दिसल्यास ते तात्काळ उचलण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला वाहनं सोडलेली असतात. महापालिकेने जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१७ या दीड वर्षांत सुमारे सात हजार वाहनं उचलली. मात्र आतापर्यंत वाहने उचलण्यासाठी शहर, पूर्व व पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी केवळ एक टोइंग व्हॅन आहे. त्यामुळे या कारवाईला मर्यादा येत असल्याने सर्व सात परिमंडळांच्या स्तरावर 'टोइंग व्हॅन' व परिमंडळ दोन, चार आणि पाचमध्ये एक अतिरिक्त अशी दहा वाहनं असणार आहेत.
अशी बेवारस वाहनं उचलल्यानंतर संबंधित वाहन मालकाला दंड भरून वाहन सोडवून नेता येणार आहे. मात्र ३० दिवसांच्या कालावधीदरम्यान वाहन सोडवून न नेल्यास त्या वाहनाचा महापालिकेद्वारे लिलाव केला जाणार आहे. आपल्या परिसरात एखादे सोडून दिलेले वाहन आढळल्यास त्याविषयीची तक्रार महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
बेवारस वाहनं गोदामात
मुंबई महापालिका अधिनियम १८८८ मधील विविध तरतुदींनुसार सोडून देण्यात आलेल्या वाहनांना नोटीस देणे, वाहन उचलणे, जप्त करणे आदी कारवाई केली जाते. या सर्वेक्षणात जी वाहने आढळून येतील अशा वाहनांव नोटीस चिकटवण्यात येईल. त्यानंतर त्यापुढच्या ४८ तासांमध्ये आपले वाहन संबंधितांनी उचलून नेले नाही, तर ते वाहन महापालिकेद्वारे उचलून 'गोदामामध्ये' जमा केले जाणार आहे.
येथे नोंदवा तक्रार
महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे किंवा १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावर नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे.
वाहनांची संख्या वाढवली
यापूर्वी अशा प्रकारे वाहन उचलण्यासाठी केवळ सहा वाहनं होती. ज्यामुळे वाहन उचलण्यासाठी विलंब होण्याची शक्यता असायची. मात्र, आता यासाठी १० टोइंग वाहने असणार आहेत. यापैकी सात वाहनं महापालिकेच्या सात परिमंडळांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहेत. तसेच २, ४ आणि ५ या तीन परिमंडळांची गरज लक्षात घेऊन तेथे प्रत्येकी एक अतिरिक्त वाहन असणार आहे.
दोन वर्षांत पालिकेने सुमारे सात हजार बेवारस वाहनं मुंबईच्या रस्त्यावरून उचलली. रस्त्यावर एक वाहन उभे करण्यासाठी १२४ चौरस फूट जागा लागते. म्हणजेच सात हजार वाहनांनी सुमारे आठ लाख ६८ चौरस फूट म्हणजेच २० एकर जागा बळकावली होती. १ जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१७ या काळात ६४१३ वाहनं उचलण्यात आली. यापैकी २८२६ वाहनांचा लिलाव करण्यात आला. तर उर्वरित वाहनं पालिकेच्या गोदामात ठेवण्यात आली आहेत. तर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात आणखी ६०५ बेवारस वाहनं रस्त्यावर उभ्या असल्याचे आढळून आले. या वाहनांचा लिलाव २३ ऑगस्ट रोजी झाला. त्यावेळीस पालिकेने २८२६ वाहनांचा लिलाव केला. यातून पालिकेला सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.