शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

त्यांच्या साहसाला कडक सॅल्यूट! दृष्टी नसलेल्या ४८ दिव्यांगांनी सर केला पुरंदर किल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:40 IST

'नयन फाउंडेशन' ही संस्था गेली १५ वर्षे अंध मुला-मुलींना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांची सफर घडवून आणत आहेत. यंदा त्यांनी ४८ अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे. 

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य आणि येथील शिखरे, महाराजांचे गडकिल्ले हे केवळ देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटकांसाठी ट्रेकिंगसाठी आकर्षित करत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक ऋतूमध्ये किल्ल्याचे सौंदर्य वेगवेगळे असते. मात्र नेत्रहिनांना त्याचा लाभ घेता येत नाही. अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन मुंबईतील रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेली 'नयन फाउंडेशन' ही संस्था गेली १५ वर्षे अंध मुला-मुलींना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांची सफर घडवून आणत आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या मदतीने अंध बांधवांनी रायगड, सिंहगड, राजगड, रायरेश्वर, सज्जनगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसूबाई सर केले आहे. यंदा त्यांनी ४८ अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे. 

मुंबईतून शनिवारी २५ जानेवारी रोजी या मुलांनी पुरंदर किल्ल्याकडे प्रयाण करत रविवारी सकाळी ही मुले किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचली. दृष्टी नाही पण गाठीला इच्छाशक्ती याच जोरावर ४८ साहसवीरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्याची वाट पकडली. पाठीवर सॅक, पायात बूट, डोक्यावर टोपी आणि प्रत्येकाच्या जोडीला मदतीचा एक हात अशा पद्धतीने एकमेकांचा आधार घेत हा किल्ला त्यांनी सर केला. प्रजासत्ताकदिनानिमित्त तिरंगा ध्वजाला मानवंदना देत या सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. हे ४८ साहसवीर आणि त्यांच्यासाठी तेवढेच मदतीचे हात बरोबर घेत मोहीम सुरू झाली. वाटा-आडवाटांवरील घसरणे-पडणे-सावरणे सुरू झाले. खड्डे, चढउतार यांचा अंदाज घेत पावले टाकली जात होती. बरोबरच्या मदतनिसांकडून प्रत्येक पावलाबाबत मार्गदर्शन केले जात होते. अशी ही दमछाक करणारी, आव्हान वाटणारी दृष्टिहीन गिर्यारोहकांची मोहीम हळूहळू गडाच्या माथ्याच्या दिशेने सरकू लागली. डोळ्यांसमोर केवळ अंधार आणि आधारासाठी एक हात...अडीच तासांमध्ये त्यांनी ४४७० फूट उंचीच्या दुर्गशिखराचा माथ्याला स्पर्श केला आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताकदिन साजरा केला. हा ध्यास आहे मुंबईतील ‘नयन फाऊंडेशन’च्या दृष्टिहीन युवकांचा आणि त्यांना मदतीचे हात देणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचा आणि स्वरुप सेवा संस्थेचा.

गडात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. मग तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करत, गडाचा इतिहास उलगडू लागला. दिवसभर इतिहास, भूगोल, गिर्यारोहणाच्या या आडवाटेवर भटकंती केल्यावर भारतमातेचा जयजयकार करत या मोहिमेचा शेवट झाला. राष्ट्रगीत झाले आणि एक आगळावेगळा दिवस अनुभवत हे सर्व खरेखुरे साहसवीर गड उतरू लागले. ज्यांच्यासाठी खरेतर दैनंदिन जीवनदेखील एखादे गिर्यारोहण असते अशा या दृष्टिहीन पावलांनी धडधाकट शरीरांना लाजवेल अशी कामगिरी केली होती. गड उतरताना त्यांच्या चेहऱ्यावर याच पराक्रमाचे स्मितहास्य उमटलेले होते. त्यांच्या जिद्दीला आत्मविश्वासाचे बळ प्राप्त झाले होते. समाजातील अंध, मुकबधिर आणि दिव्यांग बांधवाना नेहमी मदत करणे हे प्रत्येक सुजाण नागरीकाचे कर्तव्य आहे.

टॅग्स :Purandarपुरंदर