४,५०० डॉक्टर संपावर, राज्यभर रुग्णांचे हाल
By Admin | Updated: March 21, 2017 06:24 IST2017-03-21T04:22:30+5:302017-03-21T06:24:09+5:30
शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले सुरूच असून गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसल्याने

४,५०० डॉक्टर संपावर, राज्यभर रुग्णांचे हाल
मुंबई : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले सुरूच असून गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसल्याने सोमवारी राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत झाली. सुमारे ४ हजार ५०० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले होते.
दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये ११०० सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिली. तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला.
राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवर हल्ले सुरूच आहेत. धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. रोहन महामुणकर यांच्यावर १२ मार्च रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला झाला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात १७ मार्च रोजी अधिपरिचारिका चारुशिला इंगळे व वैद्यकीय अधिकारी राहुल नामदेव पाटील यांना मारहाण करण्यात आली. १८ मार्च रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात डॉ. रोहित कुमार यांच्यावर हल्ला झाला. तर रविवारी रात्री औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात डॉ. उमेश काकडे आणि डॉ. विवेक बडगे यांना मारहाण झाली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे निवासी डॉक्टरांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत जवळपास ५० निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर्स सोमवारी सामूहिक रजेवर गेले.
नागपूरच्या मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ५० टक्के शस्त्रक्रिया रखडल्या. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील रुग्णसेवा संपामुळे कोलमडून गेली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले, यांच्यासमवेत निवासी डॉक्टरांची बैठक झाली. सुरक्षा यंत्रणा सक्षम होत नाही, तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्धार डॉक्टरांनी बोलून दाखविला. (प्रतिनिधी)
रुग्ण व नातेवाईकांसाठी ‘प्रवेश पास’ -
रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांना एक 'प्रवेश पास' व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन 'प्रवेश पास' देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी दिले. ज्या व्यक्ती विना पास रुग्णालयात आढळून येतील त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही मेहता यांनी सांगितले.
जर निवासी डॉक्टरांनी काम सुरू केले नाही, तर नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी डॉक्टरांच्या बैठकीत दिला.
डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील केईएममधील १२६ शस्त्रक्रिया, शीव १०२ आणि जे. जे. रुग्णालयातील २२ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी रुग्णालयांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरूहोती.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे सदस्य मंगळवारी निवासी डॉक्टरांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करण्यात येईल.- डॉ.सागर मुंदडा, इंडियन मेडिकल असोसिएशन, युथ विंग अध्यक्ष
राज्यभरात सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात ‘मार्ड’चा संघटना म्हणून सहभाग नाही. असुरक्षिततेच्या भावनेमुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर वैयक्तिक पातळीवर सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे संघटना केवळ कायदेशीरपद्धतीने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील हे आम्ही सांगू शकत नाही.
- डॉ. स्वप्निल मेश्राम,
सचिव, ‘मार्ड’.