सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ४५० कोटींचा निधी
By Admin | Updated: December 16, 2014 02:26 IST2014-12-16T02:26:31+5:302014-12-16T02:26:31+5:30
सूक्ष्म सिंचन योजनेसाठी पुढील २ वर्षांत ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ४५० कोटींचा निधी
नागपूर : सूक्ष्म सिंचन योजनेसाठी पुढील २ वर्षांत ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली आहे. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली. अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे आदी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या योजनेसाठी गेल्या दोन वर्षांचे अनुदान बाकी आहे. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा केला. पण निधी उपलब्ध झाला नाही. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आता पूर्ण निधी देण्याबाबत मान्यता दिली आहे. शिवाय ४५० कोटी रुपयांच्या कर्जाची शिफारस शासनाने नाबार्डकडे केली आहे. यापैकी १५० कोटी या आर्थिक वर्षात तर उर्वरित ३०० कोटी पुढील दोन वर्षांत उपलब्ध होणार आहेत असे खडसे यांनी स्पष्ट केले. शिवाय आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत १०० टक्के अनुदान मिळावे यासाठी केंद्र अनुकूल आहे. यावर अंतिम निर्णय झालेला नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले.
पशुवैद्यकीय सेवेतील १,०८४ पदे रिक्त
नागपूर : राज्यात पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुवैद्यकीय सेवेतील १ हजार ८४ पदे रिक्त असल्याची माहिती शासनाने दिली आहे. राज्यातील ही रिक्त पदे भरण्यासंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे, संजय दत्त व भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात माहिती देताना पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही विभागाकडून सुरू आहे. तोपर्यंत रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार नजीकच्या अधिकाऱ्याकडे देऊन पशुपालकांना नियमित सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत असेदेखील लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)