३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन
By Admin | Updated: August 15, 2016 00:59 IST2016-08-15T00:59:37+5:302016-08-15T00:59:37+5:30
नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे

३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन
पुणे : मंगळवार पेठेतील जुना बाजाराच्या मागे नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कुटुंबीयांना घरे देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणीचे आयोजन केले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करून त्यांना हडपसर येथे मालकी हक्काच्या घरांचा ताबा दिला जाणार आहे.
जुन्या बाजाराच्या मागील बाजूस नदीकाठी राहत असलेल्या ३८० कुटुंबांना पावसाळ््यामध्ये मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्यांच्या घरांमध्ये पाणी जात असे. सर्व सामान घरात सोडून त्यांना महापालिकेतील शाळेचा आसरा घ्यावा लागत असे. या कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय तायडे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये प्रशासनासमोर ठेवला. मात्र, अनेक दिवसांपासून या प्रस्तावावर कार्यवाहीच झाली नव्हती. अखेर या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी येत्या शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्याची जाहिरात महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नदीपात्रात अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली असल्याने या कुटुंबांना महापालिकेच्या वतीने ड्रेनेज, पाणी या कोणत्याही मूलभूत सुविधा पुरता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना प्रचंड अडचणींचा सामना या कुटुंबांना करावा लागत होता.
हडपसर येथे महापालिकेने बांधलेल्या घरांमध्ये या कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे. जुन्या बाजारात परिसरातील नदीपात्रातील मोठी जागा प्रशासनाला मोकळी मिळणार आहे. कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंजुरी दिली होती.
(प्रतिनिधी)
>अतिक्रमणास अटकाव : मोकळ््या झालेल्या जागेत संरक्षक भिंत
नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे स्थलांतर झाल्यानंतर मोठी जागा मोकळी होणार आहे. जुना बाजारचा नदीकाठ यामुळे मोकळा घेणार आहे. या ठिकाणी लगेच महापालिकेकडून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. बीएसयूपी योजनेंतर्गत स्थलांतर करण्याच्या प्रस्तावामध्ये संरक्षक भिंत बांधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकणार नाही.जुन्या बाजारातील आपले मतदारांचे स्थलांतर होईल, या भीतीपोटी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबांच्या पुनर्वसनामध्ये खोडा घातला जात होता. जुन्या बाजारातच तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून घरे देऊ, अशी आश्वासने दिली जात होती. मात्र हा परिसर नदीपात्रातील असल्याने कायद्यातीन तरतुदीनुसार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य नव्हते. येथील नागरिकांना याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी स्थलांतरास तयारी दर्शविली आहे. हडपसर येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणाऱ्या या कुटुंबांचा राहणीमानाचा दर्जा यामुळे सुधारणार आहे. त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. झोपडपट्टीमध्ये नदीकाठी त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहावे लागत होते. त्यापासून त्यांची सुटका होणार आहे.