तिसऱ्या लोहमार्गासाठी ३८० कोटी रुपये देणार
By Admin | Updated: April 8, 2017 01:21 IST2017-04-08T01:21:04+5:302017-04-08T01:21:04+5:30
पुणे ते लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग उभारण्यासाठी महापालिकेने ३८० कोटी रुपये द्यावेत

तिसऱ्या लोहमार्गासाठी ३८० कोटी रुपये देणार
पिंपरी : पुणे ते लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग उभारण्यासाठी महापालिकेने ३८० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे केली. त्यावर याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवून महापालिकेचा हिस्सा दिला जाईल, असे पक्षनेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे-लोणावळा या मार्गावर उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे. भूसंपादन वगळता या प्रकल्पासाठी दोन हजार ३०६ कोटी खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा पन्नास टक्के भार केंद्र सरकार व उर्वरित एक हजार १५३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. सरकारच्या वतीने पीएमआआरडीए, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च करणार आहे. पुणे-लोणावळा असा सध्या दुहेरी लोहमार्ग आहे. सध्या या मार्गावरून दररोज ४४ उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. तर, दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करतात. तिसरा आणि चौथा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या आणि प्रवासी संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिस्सा द्यावा, असा ठराव महासभेसमोर आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने तो मंजूर केला नव्हता. महापालिका निवडणुकीनंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत सत्तारूढ पक्षनेत्यांना पत्र दिले आहे. हा विषय सर्वसाधारण सभेसमोर घेण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. पत्र मिळताच पक्षनेत्यांनी याबाबत सकारात्मता दर्शविली आहे.
पवार म्हणाले, ‘‘आमदारांनी केलेल्या मागणीनुसार लोहमार्ग विस्तारीकरणासाठी आपल्या हिश्श्याची ३८० कोटी रुपयांची रक्कम देण्यास तयार आहे. यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडून संमत करण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)