अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु.) येथील एका ३५ वर्षीय तरुणाने मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणा करत आहे, सरकार मनाेज जरांगे-पाटील यांच्यावर वारंवार उपाेषणाची वेळ आणत आहे, असा आराेप बळीराम श्रीपती मुळे या तरुणाने चिठ्ठीत केला आहे. उपचारासाठी त्याला लातुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली.
पाेलिसांनी सांगितले, मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा मनाेज जरांगे-पाटील यांनी ‘चलाे मुंबई’चा नारा दिला आहे. गावागावांतील मराठा समाजबांधवांनी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. अहमदपूर तालुक्यातून मुुंबईकडे समाजबांधव माेठ्या प्रमाणावर रवाना हाेणार आहेत. शिंदगी बु. (ता. अहमदपूर) येथील ३५ वर्षीय तरुण बळीराम मुळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून जरांगे-पाटील यांच्यावर वारंवार उपाेषण करण्याची वेळ आणत आहे. शिवाय, याबाबत सरकारकडून वेळकाढूपणाचे धाेरण राबविले जात आहे. सरकारकडून सहकार्य केले जात नाही, असा आराेप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाने चिठ्ठीमध्ये केला आहे. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नाेंद करण्यात आली नव्हती.
अहमदपूर पाेलीस करत आहेत चाैकशी...मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिंदगी (बु.) येथील बळीराम श्रीपती मुळे या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. याबाबत आम्ही अधिक चाैकशी करीत आहाेत. - बी. डी. भुसनूर, पाेलिस निरीक्षक, अहमदपूर