३५ मजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:31 IST2016-11-04T02:31:58+5:302016-11-04T02:31:58+5:30

दिवाळीचा सण असल्याने आॅक्टोबर महिन्याचा पगार २८ आॅक्टोबर वा तत्पूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा

35 laborers, employees in the dark without pay for Diwali | ३५ मजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात

३५ मजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात

जयंत धुळप,

अलिबाग- दिवाळीचा सण असल्याने आॅक्टोबर महिन्याचा पगार २८ आॅक्टोबर वा तत्पूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असताना, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागातील अलिबाग उप अभियंता कार्यालयांतर्गत येणाऱ्या १९ मजुरांसह एकूण ३५ कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळी होवून गेली तरी अद्याप मिळाला नाही. या सर्व मजूर व कर्मचाऱ्यांची दिवाळी उप अभियंता कार्यालयाच्या बेफिकिरीमुळे अंधकारमय झाल्याने, या कर्मचाऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व मजुरांनी आपला पगार मिळावा याकरिता गुरुवारी उप अभियंता व्ही.जी.देशपांडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात नसल्याने भेटच होवू शकली नाही. त्यानंतर या मजुरांनी त्यांचे वरिष्ठ व अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देखील मिळाले नसल्याने हे सर्व मजूर नाराज झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग बदनाम होत असताना, आम्ही या रस्त्यावरील खड्डे उपलब्ध साधनसामग्रीतून गेल्या महिनाभरात भरुन रस्ते दुरुस्त करण्याचे काम करीत असताना, रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या शिव्या खात होतो. त्यावेळी या अभियंत्यांपैकी कोणीही रस्त्यावर फिरकले सुद्धा नाहीत. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सर्व अधिकाऱ्यांचे पगार अगदी वेळेवर झाले. मात्र आमचे पगार झाले नाहीत याचे सोयरसुतक त्यांना नाही. आमच्या कुटुंबात दिवाळीचा सण नाही काय? असा प्रश्न या मजुरांनी के ला आहे.
मजुरांचे पगार झाले नाहीत याबाबत काय अडचण होती हे जाणून घेण्याकरिता अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘त्यांच्या पगाराशी माझा संबंध नाही, उप अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधा’ असे त्यांनी सांगितले.
>कामाच्या गडबडीमुळे पगार होवू शकले नाहीत
अलिबाग सा.बां. उप अभियंता व्ही.जी.देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, १९ मजुरांसह एकूण ३५ कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत हे खरे आहे. कार्यालयातील कामाच्या गडबडीमुळे पगार होवू शकले नाहीत, याची खंत आहे. मात्र पुढच्या महिन्यापासून मजूर व क र्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील याची आम्ही काळजी घेवू, असे देशपांडे यांनी ‘लोकमत‘शी बोलताना
सांगितले.
>मजूर व कर्मचाऱ्यांबरोबर करणार बोलणी
दिवाळीपूर्वी आॅक्टोबर महिन्याचा पगार अदा करणे बंधनकारक असताना तो अद्याप अदा झाला नाही, तो कधी अदा होणार, यावर मात्र ते समर्पक उत्तर व्ही.जी.देशपांडे देवू शकले नाहीत. शुक्रवारी मी सर्व मजूर व कर्मचाऱ्यांना बोलावणार आहे, पगार लवकर कसा करता येईल हे पाहातो असे यांनी सांगितले. नेमकी कर्मचाऱ्यांबरोबर बैठक अर्थात बोलणी झाल्यावरच यावर निर्णय होणार आहे.

Web Title: 35 laborers, employees in the dark without pay for Diwali