३०० डॉक्टरांचे राजीनामास्त्र
By Admin | Updated: July 2, 2014 00:56 IST2014-07-02T00:56:09+5:302014-07-02T00:56:09+5:30
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो) विविध मागण्यांना घेऊन मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज नागपूर जिल्ह्यातील

३०० डॉक्टरांचे राजीनामास्त्र
ग्रामीण आरोग्य सेवा ढासळली: मॅग्मो संघटनेचे बेमुदत आंदोलन
नागपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेने (मॅग्मो) विविध मागण्यांना घेऊन मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून आज नागपूर जिल्ह्यातील ३०० वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मॅग्मो संघटेनेच्या राज्यध्यक्षांकडे पाठविले. डॉक्टरांच्या या आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी ग्रामीण आरोग्य सेवा ढासळली.
सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीला घेऊन शासन अन्याय करीत आहे. केंद्र सरकार तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, या मुख्य मागणीला घेऊन मॅग्मो संघटनेने हे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनात राज्यातील १२ हजार तर नागपूर जिल्ह्यातील ३६५ वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानावर मॅग्मो संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद रक्षमवार आणि अध्यक्ष राजेश गायकवाड बेमुदत उपोषणावर बसले आहेत. ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी डॉक्टरांना सामूहिक राजीनामे द्यावे लागावेत, यावर जोरदार चर्चा सुरू होती.
राजीनामे मुंबईकडे रवाना
सदर येथील जिल्हा प्रशिक्षण पथकासमोर आज सकाळी १० वाजतापासून आंदोलनाला सुरुवात झाली. मॅग्मोचे जिल्हा अध्यक्ष डॉ. विद्यानंद गायकवाड यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे देण्यात आले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, राजीनाम्यावर ३०० डॉक्टरांनी स्वाक्षरी केल्या आहेत. राजीनाम्याची ही प्रत मुंबई येथे उपोषणाला बसलेले संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. गायकवाड आणि डॉ. रक्षमवार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या आंदोलनाला जिल्हा शल्य चिकित्सकांची संघटना, औषध निर्माता कर्मचारी संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. तेही आंदोलनात सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव हर्षवर्धन मानेकर, डॉ. हरीश महंत, डॉ. स्मिता उके, डॉ. सोनाली किरडे, डॉ. प्राजक्ता गुप्ता, डॉ. नरेंंद्र पटले, डॉ. अख्तर, डॉ. पारवेकर, डॉ. इंदूरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)