चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडण
By Admin | Updated: August 16, 2014 02:15 IST2014-08-16T02:15:18+5:302014-08-16T02:15:18+5:30
श्रमिक एल्गारतर्फे चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे.

चंद्रपूरमध्ये दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडण
वरोरा (जि़ चंद्रपूर) : श्रमिक एल्गारतर्फे चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने नुकतेच वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडण करून दारूबंदीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
श्रमिक एल्गारतर्फे दारूबंदीच्या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात येत आहेत. याची दखल घेत राज्य शासनाने दारूबंदीसंदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाकडे दोन वर्षांपूर्वी अहवाल सादर केला. या अहवालावर आजतागायत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता, श्रमिक एल्गारच्या पदाधिकारी व सदस्यांनी दारूबंदीबाबत छेडले असता, सध्या आचारसंहिता आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सांगितले होते. वारंवार पाठपुरावा करूनही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात येत नसल्याने श्रमिक एल्गारच्या वतीने आॅगस्ट क्रांती अभियान सुरू करण्यात आले. १३ आॅगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही, तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या वरोरा येथील निवासस्थानासमोर १४ आॅगस्ट रोजी महिला मुंडण करतील, असा इशारा देण्यात आला होता. देवतळे यांच्या निवासस्थानासमोर मुंडण करण्याची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर वरोरा येथील महात्मा गांधी चौकात दुपारी १२ वाजता मुंडण आंदोलनाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)