दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडन

By Admin | Updated: August 15, 2014 00:40 IST2014-08-15T00:40:14+5:302014-08-15T00:40:14+5:30

श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने

30 women's mundan for drunkenness | दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडन

दारूबंदीसाठी ३० महिलांचे मुंडन

चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांचा एल्गार : मुख्यमंत्र्यांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप
वरोरा : श्रमिक एल्गारच्यावतीने मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलने करण्यात येत आहे. शासनाला १३ आॅगस्ट ही शेवटची मुदत दिल्यानंतरही दारूबंदीची घोषणा करण्यात आली नसल्याने गुरूवारी वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडन करून दारूबंदीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे.
श्रमिक एल्गारच्यावतीने पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मागील चार वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी व्हावी, याकरिता विविध आंदोलने करण्यात येत आहे. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने दारूबंदीसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाकडे दोन वर्षांपूर्वी अहवाल सादर केला. या अहवालावर आजतागायत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. लोकसभा निवडणूक प्रचार दौऱ्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता, श्रमिक एल्गारच्या पदाधिकारी व सदस्यांनी दारूबंदीबाबत छेडले असता, सध्या आचारसंहिता आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात येत नसल्याने श्रमिक एल्गारच्यावतीने आॅगस्ट क्रांती अभियान सुरू करण्यात आले.
१३ आॅगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या वरोरा येथील निवासस्थानासमोर १४ आॅगस्ट रोजी महिला मुंडन करतील, असा इशारा देण्यात आला होता. ना.देवतळे यांच्या निवासस्थानासमोर मुंडन करण्याची परवानगी प्रशासनाने नाकारल्यानंतर वरोरा येथील महात्मा गांधी चौकात दुपारी १२ वाजता मुंडन आंदोलनाला सुरूवात झाली. प्रारंभी अनेक महिलांनी स्फूर्ती गीते सादर केली. अनेकांनी आपले विचारही व्यक्त केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली पाहिजे. या मागणीकरिता श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांच्यासह ३० महिलांनी मुंडन केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 30 women's mundan for drunkenness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.