अंगणवाड्यांसाठी हवे ३० कोटी
By Admin | Updated: January 14, 2015 00:41 IST2015-01-14T00:41:50+5:302015-01-14T00:41:50+5:30
जिल्ह्यातील २३३९ पैकी १०३३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. १३३६ अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. या अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी ३० कोटींची गरज आहे.

अंगणवाड्यांसाठी हवे ३० कोटी
बांधकाम केव्हा होणार : १३३६ अंगणवाड्यांना इमारत नाही
नागपूर : जिल्ह्यातील २३३९ पैकी १०३३ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत आहे. १३३६ अंगणवाड्या ग्रामपंचायत, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. या अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी ३० कोटींची गरज आहे.
अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत असावी, या हेतूने शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. २०१३ पर्यंत अंगणवाडी बांधकामासाठी प्रत्येकी चार लाखांचा निधी मिळत होता. परंतु बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने कंत्राटदारांचा या योजनेला प्र्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहिला.
२९ जानेवारी २०१४ ला मानव विकास मिशनअंतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी बिगर आदिवासी भागात ६ तर आदिवासी भागात ६.६० लाखांचा निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु दुसरीकडे तेरावा वित्त आयोग व जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून याच कामासाठी चार लाखांचा निधी मंजूर केला जात होता. एकाच कामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कमी-अधिक निधी मिळत असल्याने, संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाड्यांची कामे प्रलंबित आहेत. २००९ ते-२०१३ या दरम्यान ७७० कामांना मंजुरी असताना, प्रत्यक्षात २१४ अंगणवाड्या पूर्ण करण्यात आल्या. उर्वरित कामे प्रलंबित आहेत. दुसऱ्याच्या वा भाड्याच्या जागेतील ५५६ अंगणवाड्यांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. ५०२ प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. २०१३ पूर्वी मंजुरी मिळाली परंतु बांधकामासाठी चार लाखाचाच निधी मंजूर आहे. या रकमेत बांधकाम शक्य नसल्याने हा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे. (प्रतिनिधी)