मोबाइलवरून दिली ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा
By Admin | Updated: April 6, 2017 02:12 IST2017-04-06T02:12:21+5:302017-04-06T02:12:21+5:30
महाविद्यालयात परीक्षा होती, पण उत्तरपत्रिका वाटण्यात आल्या नाहीत

मोबाइलवरून दिली ३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा
मुंबई : महाविद्यालयात परीक्षा होती, पण उत्तरपत्रिका वाटण्यात आल्या नाहीत आणि मोबाइल बाहेर ठेवण्यासदेखील सांगण्यात आले नाही. कारण मोबाइलवरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि लगेच निकालही त्यांच्या मोबाइलवर त्यांना मिळाला. विद्याविहारच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयात तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांनी २५ गुणांची परीक्षा मोबाइलवरून दिली. ‘क्लिकर (क्लासरूम रिस्पॉन्स सीस्टिम) व्होटिंग मशिन डिवाइस’च्या सहाय्याने
केलेला हा देशातील पहिला प्रयोग असून, तो यशस्वी झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात नवनवीन यंत्रांचा वापर वाढला आहे. संशोधनामुळे गेल्या काही वर्षांत अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. शैक्षणिक संस्थाही आता हायटेक होत आहेत. के. जे. सोमय्या कला, वाणिज्य महाविद्यालयात तर आता परीक्षांसाठी मोबाइलचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही वेळ वाचतो. त्याचबरोबरीने पेपरसाठी होणारा खर्चही कमी झाला आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर निकालाची बराच काळ वाट पाहावी लागते, पण आता असे होणार नाही. विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तर त्यांना समजते आणि तत्काळ गुणही मिळतात. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा प्रश्नही उद्भवत नाही.
सोमय्या महाविद्यालयाचे प्रो-होस्ट डॉ. राजन वेळुकर यांनी या तंत्रज्ञानाविषयी सांगितले, आॅफी क्लिकर तंत्रज्ञान नवीन असून, देशात पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही फायदा होणार आहे. परीक्षेसह नियमित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर पुढच्या काळात करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या दृष्टीने कल समजणार आहे. त्याचबरोबरीने एखाद्या विषयाचे आकलन झाले आहे की नाही, हे शिक्षकांना तत्काळ समजणार आहे. (प्रतिनिधी)
काय आहे आॅफी? : मोबाइलद्वारे परीक्षेसाठी देण्यासाठी आॅफी तंत्रज्ञान के. जे. सोमय्याचा माजी विद्यार्थी अमित शहा याने विकसित केले आहे. ‘आॅफी क्लिकर’साठी (क्लासरूम रिस्पॉन्स सीस्टम) विद्यार्थ्यांना इंटरनेटची आवश्यकता नाही. आॅफी हे मोबाइलसारखे दिसणारे डिवाइस आहे. हे डिवाइस मोबाइलला कनेक्ट करायचे. १२०० ते १५०० वर्गफुटाच्या क्षेत्रफळातील किंवा १२० विद्यार्थी संख्या असलेले वर्ग या तंत्रज्ञानाच्या मदतीने कनेक्ट केले जाते. आॅफी डिवाइसमध्ये असेलेले कंटेंट विद्यार्थी डाउनलोड करू शकतात. यासाठी इंटरनेट किंवा कोणतेही शुल्क लागणार नाही. या डिवाइसमध्ये तीन टीबीपेक्षा जास्त कंटेंट साठवता येणार आहे. विद्यार्थी मोबाइवरून व्होटिंग मशिनप्रमाणे उत्तरे देऊ शकतात़