काँग्रेस, राष्ट्रवादीला हव्या ३ जागा
By Admin | Updated: July 15, 2014 03:12 IST2014-07-15T03:12:34+5:302014-07-15T03:12:34+5:30
आगामी विधानसभेसाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निम्या म्हणजे १४४ जागांची मागणी केली असताना ठाणे शहरातील चारपैकी एकच आमदारकी हाताशी असतानाही राष्ट्रवादीने तीन जागांवर दावा केला आहे

काँग्रेस, राष्ट्रवादीला हव्या ३ जागा
जितेंद्र कालेकर, ठाणे
आगामी विधानसभेसाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निम्या म्हणजे १४४ जागांची मागणी केली असताना ठाणे शहरातील चारपैकी एकच आमदारकी हाताशी असतानाही राष्ट्रवादीने तीन जागांवर दावा केला आहे. त्याचवेळी काँग्रेसने मात्र गेल्या वेळी लढविलेल्या ठाणे, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा या तिन्ही जागांवर दावा केल्याने ठाण्यातला पेच प्रदेश पातळीवरून कसा सोडविला जातो, याकडे ठाण्यातील नेत्यांचे लक्ष आहे.
गेल्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी ठाणे शहरातील ठाणे, कळवा मुंब्रा, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा या चारपैकी कोपरी पाचपाखाडी, ठाणे आणि ओवळा माजीवडा या तीन जागा काँग्रेसने लढविल्या होत्या, तर कळवा मुंब्रा ही जागा राष्ट्रवादीने लढवून जितेंद्र आव्हाडांच्या रूपाने जिंकली होती. उर्वरित तीन जागा लढविणाऱ्या काँग्रेसला तीनही ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ठाण्यात राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली आणि १७ हजार २४४ मते मिळविली, तर पराभूत झालेल्या सुभाष कानडेंना ३६ हजार २८८ मते मिळाली.
या दोन्ही मतांची बेरीज केली
तर आघाडीला ५३ हजार ५३२ मते
होतात. निवडणूक जिंकणाऱ्या शिवसेनेच्या राजन विचारेंनी ५१ हजार १० मते मिळविली. म्हणजे भोईरांनी
मते खाल्ल्यामुळेच आघाडीच्या कानडे यांना पराभव पत्करावा लागला. त्या वेळी भोईर यांच्यावर राष्ट्रवादीने
तात्पुरती कारवाई केली होती. पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशही
मिळविला.
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासाठी ठाण्याच्या जागेचा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे, तर देवराम भोईरही पुन्हा इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. ओवळा माजिवडा या मतदारसंघातून गेल्या वेळी काँग्रेसच्या दिलीप देहेरकर यांचा शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी पराभव केला होता. या जागेवरही राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येत आहे. कोपरी पाचपाखाडीची जागा काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी लढविली होती. मात्र शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. तर कळवा मुंब्रा या मतदारसंघातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारल्यामुळे तिथे मात्र काँग्रेसने दावा न करता ती जागा राष्ट्रवादीला देण्याचे मान्य केले आहे.
मुंब्रावगळता कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि ठाणे या तिन्ही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे, तर राष्ट्रवादीने मात्र कळवा मुंब्रासह ओवळा माजिवडा आणि ठाणे शहर या दोन वाढीव अशा तीन मतदारसंघांवर दावा केल्याने जागावाटपाच्या वेळी या दोन जागांवरून प्रदेश आणि स्थानिक नेत्यांमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत.