२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:04 IST2025-03-18T20:03:16+5:302025-03-18T20:04:05+5:30

 काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल असं सांगत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला

3 Ex corporators including 2 former MLA join Eknath Shinde Shivsena; shock to Uddhav Thackeray in Mumbai | २ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

२ माजी आमदारांसह ३ नगरसेवकांनी हाती धरलं 'धनुष्यबाण'; मुंबईत शिंदेंचा ठाकरेंना धक्का

मुंबई - मागील अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला, मात्र सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केले असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. मुंबई, कोकण परिसरातील नेत्यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. आजच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंनी पुन्हा उद्धव ठाकरे गटाला दणका दिला आहे. 

ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की, दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहे. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम कोकणात काम करत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मागील पंचवीस वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातील. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहणार आहे. पन्नास खोके नव्हे तर तीन हजार खोके विकास कामांसाठी दिले आहेत.  काम करणारा कार्यकर्ता उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल असं सांगत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावला. माजी आमदार संजय कदम यांची पक्षात प्रवेश करताच उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. 

दरम्यान, यावेळी मुंबईतील भांडुपचे माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखप्रमुख, महिला सेना आणि शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. छ. संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर मतदार संघात आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबीर खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, माजी पंचायच समिती सभापती-राजू मगर, डॉ.राजू डोंगरे,  राम हरी जाधवे,  बाबासाहेब जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Web Title: 3 Ex corporators including 2 former MLA join Eknath Shinde Shivsena; shock to Uddhav Thackeray in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.