राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी ‘शक्तीसदन’; योजनेची उद्दिष्टे, सुविधा कोणत्या...जाणून घ्या
By समीर देशपांडे | Updated: March 24, 2026 18:18 IST2026-03-24T18:17:44+5:302026-03-24T18:18:23+5:30
केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेतून ही केंद्रे चालवण्यात येणार

संग्रहित छाया
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यातील २३ जिल्ह्यांच्या ठिकाणी २९ ‘शक्तीसदन’ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेतून ही केंद्रे चालवण्यात येणार आहेत.
शक्तीसदन योजना ही महिला व बालविकास क्षेत्रातील एक महत्त्वाची योजना आहे, जी मुख्यतः अत्याचारग्रस्त, बेघर किंवा संकटात सापडलेल्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी गरजू महिलांना तात्पुरता आश्रय, संरक्षण आणि पुनर्वसनाची सुविधा दिली जाते. संकटग्रस्त महिलांना सुरक्षित निवारा देणे, मानसिक, वैद्यकीय व कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, महिलांना स्वावलंबी बनवणे (कौशल्य प्रशिक्षणाद्वारे) आणि सामाजिक पुनर्वसन ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
घरगुती हिंसाचार पीडित, मानवी तस्करीतून मुक्त झालेल्या, बेघर, निराधार महिला, कुटुंबाने नाकारलेल्या महिला आणि नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात अडकलेल्या महिलांना या शक्तिकेंद्रात प्राधान्य देण्यात येणार आहे.
दिल्या जाणाऱ्या सुविधा
सुरक्षित निवास, अन्न व मूलभूत गरजा, आरोग्यसेवा, कायदेशीर मदत, समुपदेशन, कौशल्य विकास, रोजगारासाठी मदत
या जिल्ह्यात उभारण्यात येणार शक्तीसदन
मुंबई शहर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, नंदुरबार, अहिल्यानगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, परभणी, बीड, पालघर या ठिकाणी प्रत्येकी एक तर ठाणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक, जळगाव, नांदेड या ठिकाणी प्रत्येकी दोन शक्तिकेंद्रे उभारण्यात येणार आहेत.