१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:51 IST2025-12-18T16:51:25+5:302025-12-18T16:51:53+5:30

यवतमाळच्या गावात ३ महिन्यात २७ हजार जन्मांच्या नोंदी आढळल्याने खळबळ उडाली आहे.

27000 births registered in a village in Yavatmal in 3 months massive birth certificate scam | १५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड

१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड

Yavatmal Birth Scam:यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी या अवघ्या १५०० लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावात गेल्या तीन महिन्यांत तब्बल २७,३९७ जन्मांच्या नोंदी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरी नोंदणी प्रणालीत झालेल्या या नोंदींमुळे आरोग्य प्रशासन हादरले असून, यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारीचे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शासकीय आदेशानुसार सध्या बेकायदेशीररीत्या उशिराने होणाऱ्या जन्म-मृत्यू नोंदींची पडताळणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आर्णी तालुक्यातील आरोग्य विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या सीआरएस सॉफ्टवेअरमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत २७,३९७ जन्म आणि ७ मृत्यूंच्या नोंदी आढळल्या. १५०० लोकसंख्या असलेल्या गावात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्म होणे अशक्य असल्याने तातडीने चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई कनेक्शन उघड

या प्रकरणाची तांत्रिक तपासणी केली असता अधिक धक्कादायक माहिती समोर आली. शेंदुरसनी ग्रामपंचायतीचा सीआरएस आयडी चक्क मुंबईशी मॅप असल्याचे आढळले. याचा अर्थ, यवतमाळच्या या ग्रामपंचायतीचा आयडी वापरून मुंबईतून किंवा अन्य ठिकाणाहून हे बोगस दाखले तयार केले जात होते.

तपासणीत काय सापडले?

गावात प्रत्यक्षात होणाऱ्या जन्मांच्या तुलनेत ही संख्या हजारो पटीने जास्त आहे. चौकशी समितीला आढळले की, या २७,३९७ नोंदींपैकी एकही नोंद शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नाही. पुणे येथील आरोग्य सेवा उपसंचालक आणि नवी दिल्लीतील अतिरिक्त निबंधक जनरल कार्यालयाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणानुसार, हा सगळा सायबर फ्रॉड असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शेंदुरसनी गावाला भेट दिली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामागे देशविरोधी कारवाया किंवा बनावट कागदपत्रे बनवण्याचे मोठे रॅकेट असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले तयार करून त्यांचा वापर पासपोर्ट बनवणे, नागरिकत्व सिद्ध करणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.

Web Title : यवतमाल जन्म प्रमाण पत्र घोटाला: 1500 की आबादी वाले गाँव में 27,000 जन्म दर्ज!

Web Summary : यवतमाल के शेंदुरसनी गांव में जन्म प्रमाण पत्र घोटाला। 1500 की आबादी में तीन महीने में 27,397 जन्म दर्ज। मुंबई से जुड़े इस धोखे से अवैध गतिविधियों की आशंका है।

Web Title : Yavatmal birth certificate scam: 27,000 births recorded in village of 1500!

Web Summary : A massive birth certificate scam in Yavatmal's Shendursani village, population 1500, recorded 27,397 births in three months. The fraud, linked to Mumbai, raises concerns about illegal activities and potential misuse of documents.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.