फुटपाथवरील २४०० झाकणे गेली चोरीला
By Admin | Updated: May 15, 2014 23:39 IST2014-05-15T21:38:09+5:302014-05-15T23:39:22+5:30
ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या फुटपाथवरील तब्बल २४०० झाकणे चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे.
फुटपाथवरील २४०० झाकणे गेली चोरीला
ठाणे -
ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या फुटपाथवरील तब्बल २४०० झाकणे चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या संदर्भात महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नसून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून त्याठिकाणी आता पुन्हा नवीन झाकणे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्सूनपूर्व तयारीच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात असलेल्या ५६५ किमींच्या फुटपाथची पाहणी केली असता, झाकणे चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली. फुटपाथवर बसविलेली झाकणे ही सिमेंटची असून त्यात लोखंडी साहित्याचा वापर केला गेला आहे. हेच लोखंड काढून भंगारात विकले जात असावे,असा कयास पालिकेने लावला आहे. परंतु ती कोणी चोरून नेली, याची माहिती पालिकेकडे नसल्याने त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही.
दरम्यान आता याचा अहवाल तयार करण्यात आला असून पावसाळ्यात यामध्ये पडून अपघात होऊ नये यासाठी महापालिका काळजी घेणार आहे. त्यानुसार येत्या ३१ मे पूर्वी ही झाकणे नव्याने बसविली जाणार असून प्रत्येक प्रभाग समितीत १०० अतिरिक्त झाकणे उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु ही झाकणे आता सिमंेट मिक्स फायबर अशा पध्दतीचे असणार आहेत.