रेशनसाठी २१ हजार मे. टन तूरडाळ
By Admin | Updated: August 17, 2016 04:11 IST2016-08-17T04:11:07+5:302016-08-17T04:11:07+5:30
एकीकडे साठेबाजांवर धाडसत्र सुरू करतानाच, दुसरीकडे रेशन दुकानांच्या माध्यमातून दर महिन्याला ७ हजार मेट्रिक अशी तीन महिन्यांसाठीची २१

रेशनसाठी २१ हजार मे. टन तूरडाळ
अतुल कुलकर्णी, मुंबई
एकीकडे साठेबाजांवर धाडसत्र सुरू करतानाच, दुसरीकडे रेशन दुकानांच्या माध्यमातून दर महिन्याला ७ हजार मेट्रिक अशी तीन महिन्यांसाठीची २१ हजार मेट्रिक टन तूरडाळ बाजारात आणण्यात येत असून, या महिन्याची डाळ राज्यातल्या रेशन दुकानांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्याच वेळी खुल्या बाजारातदेखील येत्या तीन महिन्यांत ३,८५० मेट्रिक टन तूरडाळ आणली जात आहे. त्याचा पहिला भाग म्हणून या महिन्यातली ७५० मेट्रिक टन तूरडाळ बाजारात दाखल झाल्याची माहिती अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यात बीपीएल आणि अंत्योदय अंतर्गत रेशनकार्ड धारकांची संख्या ८५ लाख आहे. कार्ड धारकाला प्रत्येकी १ किलो तूरडाळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ८५ लाखांपैकी नियमित रेशन दुकानातून धान्य घेणाऱ्यांची संख्या विचारात घेता, राज्याला दर महिन्याला ७ हजार मेट्रिक टन तूरडाळ लागेल. त्यासाठी नॅशनल कमोडिटी स्टॉक एक्सचेंजकडे दर महिन्याला तेवढ्या डाळीसाठी मागणी नोंदविण्याचा निर्णय अमलात आला असून, या महिन्याचा दरही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, आॅगस्टसाठीची तूरडाळ रेशन दुकानांमध्ये पोहोचण्याच सुरुवात झाली असून, ७ हजारांपैकी १४०० मेट्रिक टन तूरडाळीचे वाटपही सुरू झाल्याचे बापट म्हणाले.
याशिवाय खुल्या बाजारासाठी केंद्र सरकारने तूर देणे सुरू केले असून, त्यावर प्रक्रिया करून ती डाळही बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आॅगस्टसाठी ७५०, सप्टेंबरसाठी १२०० आणि आॅक्टोबरसाठी १९०० मेट्रिक टन सरकार खुल्या बाजारात आणणार आहे. आॅगस्टची ७५० मेट्रिक टन डाळ बाजारात आल्याचेही बापट यांनी सांगितले. ही डाळ ९५ रुपये किलोने विकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
१केंद्र शासनाकडून राज्य शासनाला प्राप्त झालेली तूरडाळ खुल्या बाजारात येण्यास सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये विविध मॉल, अपना बाजार आदी ठिकाणी आजपर्यंत सुमारे ४८ मेट्रिक टन तूरडाळ ९५ रुपये किलो दराने विकण्यात मुंबईत सुरुवात झाल्याचे अन्न, नागरीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.
२आतापर्यंत केंद्र शासनाकडून सुमारे ७५० मेट्रिक टन तूरडाळ राज्याला मिळाली आहे. यातील ४८ मेट्रिक टन मुंबईत अपना बाजार (८ मेट्रिक टन), एम.बी. मार्ट (८ मेट्रिक टन), बिग बझार (१७ मेट्रिक टन), हायपरसिटी (३ मेट्रिक टन), डी मार्ट (५ मेट्रिक टन), ग्रोमा (१० मेट्रिक टन), मजदूर संघ (१ मेट्रिक टन), मालाडमधील एम.बी. मार्ट (२ मेट्रिक टन), दिंडोशीतील शाहू ग्रेन (०.५ मेट्रिक टन), तसेच रियालन्स रिटेल (१० मेट्रिक टन) असे त्याचे वाटप करण्यात आले असून, ही तूरडाळ ९५ रुपये किलो दराने विकली जात आहे, असेही ते म्हणाले.
३मुंबईमध्ये कुलाबा सेंट्रल को-आॅपरेटिव्ह कज्यू. होलसेल अँड रिटेल स्टोअर्सच्या वांद्रे, विलेपार्ले येथील दुकानांमध्ये, सांताक्रुझमधील रिलायन्स रिटेल लि., अपना बाजारच्या विलेपार्ले, अंधेरी येथील दुकानांमध्ये, तसेच विलेपार्ले येथील मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये, बिग बाजाराच्या अंधेरी व विलेपार्लेतील मॉलमध्ये, अंधेरीतील डी मार्टमध्ये, बांद्रा येथील मुंबई सबबर्न शॉपकीपर वेल्फेअर असोसिएशन, जोगेश्वरीतील नंदादीप कंझ्युमर को. आॅप.सोसायटी आणि अंधेरीतील मुंबई ग्रेन डिलर्स असोसिएशन या ठिकाणीही तूरडाळ विक्री करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.