‘स्वच्छ’साठी २१ प्रवेशिका
By Admin | Updated: August 1, 2016 01:09 IST2016-08-01T01:09:19+5:302016-08-01T01:09:19+5:30
महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ पुरस्कार स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्यासाठीची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
_ns.jpg)
‘स्वच्छ’साठी २१ प्रवेशिका
पुणे : महापालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छ पुरस्कार स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्यासाठीची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी रविवारअखेरपर्यंत (दि. ३१)
२१ प्रवेशिका दाखल झाल्या
आहेत. महापालिकेने या स्वच्छ पुरस्काराची योजना जाहीर केली़ तिच्या जनजागृतीसाठी गेल्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली होती़
तब्बल ५ लाख माहितीपत्रकांचे वाटप, रेडिओवरून जाहिराती, पत्रकार परिषदा, व्हॉट्सअप मेसेज, सोसायट्या, संस्थांच्या बैठका अशा विविध माध्यमांतून लाखो रुपये खर्च करून या पुरस्काराची जनजागृती केली होती़ त्यानंतरही शेवटचे तीन दिवस राहिले असताना एकही प्रवेशिका महापालिकेला प्राप्त झाली नव्हती़ लोकमतने याबाबतचे वृत्त २८ जुलै रोजी दिले़ त्यानंतर गेल्या दोन दिवसांत २१ प्रवेशिका मिळाल्या आहेत़
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे यासाठी पालिकेने वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पुरस्कार योजना जाहीर केली; मात्र तिला प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर दोन दिवसांत २१ प्रवेशिका आल्या आहेत.
शहरातील नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनात नावीन्यपूर्ण कल्पना तसेच व्यवस्थापनाच्या पद्धतीचा समावेश करावा यासाठी आणि त्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेने या वर्षी स्वच्छ पुरस्कार योजना जाहीर केली आहे. या पुरस्कारात सहभागी होण्यासाठी १ मे ते १ आॅगस्ट २०१६ ची मुदत देण्यात आली आहे. सोमवारी ही मुदत संपत आहे. या कालावधीत विविध घटकांमधून २१ प्रवेशिका स्पर्धेसाठी आल्या असल्याचे सहायक आयुक्त एलिस पोरे यांनी सांगितले. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी या स्पर्धेची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे पोरे यांनी सांगितले.
सर्व घटकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे
कचरा समस्या सोडविण्यासाठी शहरातील विविध घटक विविध उपक्रम राबवीत असतात, पालिकेच्या मोठ्या स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे, असा प्रश्न त्यांना पडतो. मात्र, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या संस्था आणि घटकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.