वीस डॉक्टरांचे निलंबन, चार पॅथालॉजिस्टचे परवाने रद्द, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:55 IST2018-04-07T23:55:04+5:302018-04-07T23:55:04+5:30
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी नुकताच वीस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या डॉक्टरांनी अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बोगस कागदपत्र वैद्यकीय परिषदेकडे सादर केली होती. त्याचप्रमाणे चार पॅथोलॉजिस्टचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.

वीस डॉक्टरांचे निलंबन, चार पॅथालॉजिस्टचे परवाने रद्द, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे पाऊल
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी नुकताच वीस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या डॉक्टरांनी अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बोगस कागदपत्र वैद्यकीय परिषदेकडे सादर केली होती. त्याचप्रमाणे चार पॅथोलॉजिस्टचे परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.
वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही बोगस डॉक्टरकी करणाऱ्यांवर कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील डॉक्टरांची वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी सुरू केली होती. या तपासणीत अतिरिक्त पदवी रजिस्ट्रेशनसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाºया राज्यातील २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली.
यासंदर्भात परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, बनावट कागदपत्र दाखवून एमएमसीकडून अतिरिक्त पदवी परवाना मिळवणाºया मुंबईसह महाराष्ट्रातील २० डॉक्टरांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले. अशाप्रकारचे आणखी काही डॉक्टर्स आहेत, मात्र त्यांच्या कागदपत्रांच्या छाननी व तपासणीचे काम सुरु आहे. याशिवाय, पॅथालॉजिस्टवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी डॉ. उत्तुरे यांनी सांगितले की, अनेकदा पॅथोलॉजिस्टच्या जागी प्रयोगशाळांमध्ये काम करणारे तंत्रज्ञ रुग्णांच्या वैद्यकीय चाचणी अहवालावर सही करतात.
मात्र आताच परिषदेने चार प्रयोगशाळांवर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्याकडे १४०० तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ६५० प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.