सरकारी तिजोरीतून तीन तासांत काढले २ हजार कोटी
By Admin | Updated: April 1, 2015 03:07 IST2015-04-01T03:07:45+5:302015-04-01T03:07:45+5:30
भाजपा-शिवसेनेच्या सरकारने गतिमान कारभाराचा अनोखा नमुना दाखवित आज वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल पाच हजार ७५० कोटी रुपये सरकारी तिजोरीतून काढले

सरकारी तिजोरीतून तीन तासांत काढले २ हजार कोटी
यदु जोशी, मुंबई
भाजपा-शिवसेनेच्या सरकारने गतिमान कारभाराचा अनोखा नमुना दाखवित आज वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी तब्बल पाच हजार ७५० कोटी रुपये सरकारी तिजोरीतून काढले. त्यातील २ हजार कोटी हे केवळ तीन तासांत निघाले.
राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर (बिम्स) खर्चाचे आकडे आज शेवटच्या दिवशी हरणाच्या गतीने दौडत होते. सायंकाळी ५.३० पर्यंत ३६९९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ५.३० ते ८.३० या कालावधीत २ हजार ५१ कोटी रुपयांचे वितरण खर्चापोटी विविध विभागांना करण्यात आले.
गर्दी मात्र ओसरली
आघाडी सरकारच्या काळात मंत्रालय ३१ मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरू असायचे. आमदार, नेते, अधिकारी, कंत्राटदारांची गर्दी असायची. पण या वेळी अर्थमंत्र्यांनी अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची शासकीय खरेदी १५ फेब्रुवारीपासून बंद केली होती. त्यामुळे खरेदीशी संबंधित लोकांची मंत्रालयात आज गर्दी नव्हती. रात्री ८.३० ला बिम्स प्रणाली बंद करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर रात्री उशिरापर्यंत होणारे ‘व्यवहार’ होऊ शकले नाहीत. अत्यावश्यक सोडून इतर योजना खर्चाला (प्लॅन्ड) २५ टक्के, तर योजनेतर खर्चाला (नॉनप्लॅन्ड) १५ टक्के कट लावण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला होता. आजच्या अखेरच्या दिवशी हा कट लावल्याचे स्पष्ट झाले. तरीही महिनाभरात शासनाने ३४ हजार ५१९ कोटी रुपये खर्च केला.