धाराशिव - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. धाराशिव येथे युवासेना जिल्हाप्रमुख आणि नगर परिषदेचे २ नगरसेवक यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे असं या नगरसेवकांचे नाव आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भविष्यात आणखी १० नगरसेवक ठाकरेंना सोडणार असल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारीच अक्षय ढोबळे यांनी आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून राजीनामा दिला. त्यात ते म्हणाले की, स्थानिक गटबाजीमुळे मी माझ्या युवासेना विभागीय सचिव तथा धाराशिव जिल्हाप्रमुख या दोन्ही पदांचा मान राखून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडत आहे. आपण सर्वांनी दिलेला मान सन्मान आणि साथ यासाठी धन्यवाद असं त्यांनी राजीनामा पत्रात लिहिलं.
काय म्हणाले अक्षय ढोबळे?
आमदार कैलास पाटील यांनी आम्हाला कायम दुर्लक्ष केले. मकरंद राजेनिंबाळकर यांच्या गटातील आम्ही असल्याने कैलास पाटील यांच्याकडून आम्हाला टाळले जायचे. नगराध्यक्षपदासाठीही मी ओबीसी गटातून इच्छुक असताना टाळले गेले. आमच्या प्रभागात काही कार्यक्रम असेल तर बोलवले जायचे नाही. निमंत्रण नसायचे. इतरांना बोलवायचे परंतु आम्हाला पक्षात नेहमी आडकाठी आणली जायची याशिवाय अन्य कारणाने मी जड अंतकरणाने शिवसेना सोडतोय असं अक्षय ढोबळे यांनी म्हटलं.
मकरंद राजेनिंबाळकर हे विधानसभेसाठी इच्छुक होते मात्र ते उभे राहिले तर विरोधक होतील म्हणून कायम विरोधक समजलं गेले. मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासोबत आम्ही असल्याने पक्षाच्या कार्यक्रमात आम्हाला डावललं जात होते. सन्मान मिळत नव्हता. प्रभागातील कामे असतील तर त्यालाही बोलवले जात नव्हते. इतरांना बोलवायचे आणि आमच्यासोबत दुजाभाव करायचा असा आरोपही अक्षय ढोबळे यांनी केला.