मुंबई : रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ फेब्रुवारीपासून करण्यात आलेली असतानाच आता शालेय बसच्या भाड्यातही तब्बल १८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केले आहे.
राज्यात सुमारे ४० हजार नोंदणीकृत शालेय बस असून, त्यापैकी आठ हजार गाड्या मुंबईत आहेत.
दरवाढीचे कारण काय?
सध्या वाहनांच्या सुट्या भागांच्या किमती वाढल्या आहेत. इंधन दरातही वाढ झाली आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाल्याने बस चालक-मालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परिणामी बस देखभाल-दुरुस्ती खर्चात वर्षाला १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
विद्यार्थी सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर उपकरणे बसवणे अनिवार्य केले आहे. या खर्चाचा भारही बस चालक-मालकांवर आहे. यामुळे १८ टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. दरवाढीची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन विभागाला आणि शाळांना देण्यात आली आहे.
दरवाढ करण्यात आम्हाला आनंद नाही. परंतु, अवैध वाहतूक सध्या वाढली आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास १ एप्रिलपासून लागू होणारी दरवाढ रद्द करण्यात येईल. मात्र, सरकारने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यास भाडेवाढ अटळ आहे. -अनिल गर्ग (अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन)