ललितासाठी धावणार राज्यातील १६ हजार मुलं-मुली !
By Admin | Updated: July 30, 2016 13:16 IST2016-07-30T13:15:23+5:302016-07-30T13:16:06+5:30
'रिओ आॅलिम्पिक' स्पर्धेत भारताची विजयी पताका फडकाविण्यासाठी उत्सुक असलेली 'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर हिला प्रोत्साहन देण्यासाठी 'माणदेश मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे.

ललितासाठी धावणार राज्यातील १६ हजार मुलं-मुली !
>ऑनलाइन लोकमत
दहिवडी ( सातारा ), दि. ३० : ‘रिओ आॅलिम्पिक' स्पर्धेत भारताची विजयी पताका फडकाविण्यासाठी उत्सुक असलेली 'सातारा एक्स्प्रेस' ललिता बाबर हिला प्रोत्साहन देण्यासाठी रविवार, दि. ३१ जुलै रोजी 'माणदेश मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. ‘रन फॉर ललिता'साठी धावण्यासाठी राज्यातून तब्ब्ल १६ हजार मुलं-मुली सज्ज झाली आहेत.
‘ब्राझिलमध्ये होणा-या रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मोही येथील ललिता बाबर कसून सराव करत आहे. देशाचं प्रतिनिधित्व करणारी ललिता आता माणदेशापुरती राहिली नसून संपूर्णमहाराष्ट्राची अस्मिता बनली आहे. म्हणूनच या ‘सातारा एक्स्प्रेस’ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रन फॉर ललिता’ हे घोषवाक्य घेऊन ‘माणदेश मॅरेथान २०१६’चे आयोजन केले आहे. यामध्ये तब्बल १६ हजार धावपटूंची नोंदणी झाली झाली.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, दहिवडी येथील कर्मवीर चौकापासून स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धा १२ वर्षांखालील मुले, १२ वर्षांखालील मुली, १५ वर्षांखालील मुले, पंधरा वर्षांखालील मुली, १८ वर्षांखालील मुले, १८ वर्षांखालील मुली, खुला पुरुष, खुला महिला व ४५ वर्षांपुढील प्रौढ आणि सेलिब्रेटी असे गट तयार करण्यात आले आहेत. विजेत्यांना रोख बक्षिसे, सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी काही मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत दहिवडी-पिंगळी रस्ता बंद असणार आहे.
असा असेल स्पर्धेचा मार्ग
१२ वर्षे वयोगट (मुले-मुली)- इंगळे मैदान ते पिंगळी रस्ता. १५ वर्षे वयोगट (मुले-मुली)- इंगळे मैदान ते बिदाल रस्ता. १८ वर्षे वयोगट (मुले-मुली) - इंगळे मैदान ते पिंगळी रस्ता. खुला गट (१८ ते ४५ वर्षे)- इंगळे मैदान ते गोंदवले बुद्रुक रस्ता. प्रौढ गट (४५ वर्षांवरील), सेलिब्रिटी व इतर गट- इंगळे मैदान ते कर्मवीर पुतळा.