नागपुरात १५५ नगरसेवक
By Admin | Updated: December 26, 2014 00:58 IST2014-12-26T00:58:02+5:302014-12-26T00:58:02+5:30
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका आता वॉर्ड पद्धतीने होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, हुडकेश्वर-नरासाळा परिसराचा महापालिकेच्या हद्दीत झालेला समावेश पाहता नागपूर

नागपुरात १५५ नगरसेवक
वस्त्यांचे होणार स्वतंत्र वॉर्ड : १५ ते २० हजार लोकसंख्येचा एक गट
कमलेश वानखेडे - नागपूर
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुका आता वॉर्ड पद्धतीने होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या, हुडकेश्वर-नरासाळा परिसराचा महापालिकेच्या हद्दीत झालेला समावेश पाहता नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या सुमारे १५५ पर्यंत जाऊ शकते. एवढेच नव्हे तर नामनिर्देशित सदस्यांची संख्याही एक ते दोनने वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेला मिळालेला ‘अ’ वर्ग दर्जा व एमएमसी अॅक्टमधील तरतुदींचा यासाठी आधार घेतला जाणार आहे.
महापालिकेत राबविण्यात येणारी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एका वॉर्डातून एकच नगरसेवक निवडून देण्याची जुनी पद्धत पुन्हा अमलात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने हिवाळी अधिवेशन काळात घेतला. त्यानुसार अध्यादेश जारी होईल. त्यामुळे आता वॉर्डांची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी महापालिका कामी लागली आहे. राज्य शासनाकडून या संबंधीचा अध्यादेश जारी होताच महापालिका अधिकृतपणे या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
गेल्या वेळी प्रभागाची रचना करताना एका प्रभागात २५ ते ३३ हजार लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता. नवीन रचनेत एका वॉर्डासाठी १५ ते २० हजार लोकसंख्या गृहीत धरली जाईल. सुमारे १० ते १२ हजार मतदार एका वॉर्डात येतील. शहराच्या बाह्य भागात असलेल्या सुमारे ८ ते १० प्रभागातील लोकसंख्या व मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्या दोन नगरसेवक असलेल्या काही प्रभागात वॉर्ड पद्धतीत तेवढ्याच परिसरासाठी तीन नगरसेवक होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक ६८ नरेंद्रनगर मध्ये २०१२ मध्ये ४२ हजार लोकसंख्या होती. ती आता सुमारे ६० हजारावर गेली आहे. येथे एका नगरसेवकाची वाढ होऊ शकते. प्रभाग पद्धतीत एकच वस्ती दोन प्रभागात विभागल्या गेली होती. आता वस्त्यांना वॉर्डाच्या रूपात स्वतंत्र ओळख मिळेल. रामदास पेठ, धंतोली, जयताळा, बोरगाव, झिंगाबाई टाकळी, हनुमाननगर, बालाजीनगर या वस्त्यांचे स्वतंत्र वॉर्ड होतील.
नगरसेवकांची संख्या १५० पेक्षा जास्त असलेल्या महापालिकेला विशेष दर्जा दिला जातो. मात्र, नागपूर महापालिकेचा उपराजधानीचे शहर असल्यामुळे विशेष बाब म्हणून सहा महिन्यांपूर्वीच मेट्रो सिटीमध्ये समावेश करीत ‘अ’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. शिवाय महाराष्ट्र महापालिका कायद्यात महापालिकेला शासनाच्या काही अटींच्या अधीन राहून स्वत:ची नगरसेवक संख्या ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या दोन्ही बाबींचा फायदा घेत नगरसेवकांच्या वाढीव संख्येचा प्रस्ताव महापालिकेमार्फत तयार केला जाण्याची शक्यता आहे.
नरसाळा, हुडकेश्वर भागात चार नगरसेवक
हुडकेश्वर, नरसाळा हा परिसर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. येथे सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. यापूर्वी या भागात दोन प्रभाग प्रस्तावित होते. वॉर्ड रचनेमध्ये येथे सुमारे चार नगरसेवक राहण्याची शक्यता आहे.
दोन नामनिर्देशित सदस्यही वाढणार
नगरसेवकांची संख्या १३६ असताना तीन नामनिर्देशित सदस्य नियुक्त केले जायचे. नगरसेवकांची संख्या वाढून १४५ झाली तेव्हा नामनिर्देशित सदस्यांची संख्या दोनने वाढवून पाच करण्यात आली. आता नव्या वॉर्ड रचनेत नगरसेवकांची संख्या सुमारे १५५ होण्याची शक्यता असल्यामुळे नामनिर्देशित सदस्यांची संख्याही एक किंवा दोनने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट न मिळणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीनंतर सामावून घेण्यासाठी राजकीय पक्षांनाचीही अधिकची सोय होणार आहे.
२००७ मध्ये १३६ नगरसेवक
२००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. एका प्रभागात तीन नगरसेवक होते. या पद्धतीला पुढे विरोध झाला. त्यामुळे फेब्रुवारी २००७ मध्ये वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. वॉर्ड रचनेत नगरसेवकांची संख्या १३६ निश्चित करण्यात आली होती.
२०१२ मध्ये १४५ नगरसेवक
फेब्रुवारी २०१२ मध्ये वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. त्यामुळे पुनर्रचना करून महापालिकेत ७२ प्रभाग तयार करण्यात आले. प्रत्येक प्रभागात दोन व शेवटच्या प्रभागात तीन नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली. यामुळे नगरसेवकांची संख्या १४५ वर पोहचली.