पश्चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्यांची २३ कोटींची वीज देयके माफ
By Admin | Updated: June 15, 2014 22:23 IST2014-06-15T20:57:58+5:302014-06-15T22:23:30+5:30
पश्चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत.

पश्चिम विदर्भातील १४ हजार शेतकर्यांची २३ कोटींची वीज देयके माफ
अकोला : गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या, पश्चिम विदर्भातील १४ हजार ३८0 शेतकर्यांची, २३ कोटी ६९ लाख रुपयांची वीज देयके माफ झालीे आहेत. गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकर्यांचीे जानेवारी ते जून या सहा महिन्यातील कृषी पंपांची वीज देयके माफ करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची देयके माफ करण्यात आली आहेत.
गतवर्षी ओल्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणार्या अमरावती विभागातील शेतकर्यांना रब्बी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसला. गारपीट व वादळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिके व फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अशातच महावितरणने देयके थकल्यामुळे विद्युत पुरवठा तोडण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक शेतकरी पीक वाचवू शकले नाहीत. अशा शेतकर्यांना आधार देण्यासाठी, शासनाने जानेवारी ते जून २0१४ पर्यंत सहा महिन्यांची वीज देयके माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शासनाने महसूल विभागाच्या अधिकार्यांकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या याद्या मागविल्या होत्या.याद्या प्राप्त झाल्यानंतर, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांची वीज देयके माफ करण्यात आली. राज्यात एकूण ५ लाख ८७ हजार १४५ शेतकर्यांची ९२ कोटी ४९ लाख ४१ हजार रुपयांची वीज देयके माफ करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती परिमंडळात १४ हजार ३८0 शेतकर्यांचा समावेश आहे. एप्रिल ते जून या उर्वरित तीन महिन्यांची देयके पुढील टप्प्यात माफ करण्यात येणार आहेत.