सात महिन्यांत १२ डॉक्टरांवर हल्ले
By Admin | Updated: August 1, 2016 04:47 IST2016-08-01T04:47:53+5:302016-08-01T04:47:53+5:30
सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात.

सात महिन्यांत १२ डॉक्टरांवर हल्ले
मुंबई : सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांची सेवा करण्यासाठी निवासी डॉक्टर २४ तास आॅन ड्युटी असतात. पण, या रुग्णालयांत रुग्णाचा मृत्यू झाल्यास काही रुग्णांचे नातेवाईक निवासी डॉक्टरांना मारहाण करतात. जानेवारी ते जुलै २०१६ यादरम्यान १२ निवासी डॉक्टरांना मारहाण झाली. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारने आश्वासने दिली. मात्र, ते अजूनही असुरक्षित असल्याचे ३० जुलैला रात्री पुण्यातील ‘बीजेएमसी’ रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर स्पष्ट झाले.
निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे प्रकार रोखण्यासाठी रुग्णाबरोबर दोनच नातेवाईक असावेत, अशी मागणी करण्यात आली होती. कारण, समूहाची मानसिकता वेगळी असते. एकाचवेळी अनेक जण आल्यास त्यांना विरोध करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णाबरोबर एक नातेवाईक असा नियम लागू करण्यात आला होता. पण, त्याचे पालन केले जात नाही. राज्यातील सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये मिळून ८९६ सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतील, असे आश्वासन सरकारने सप्टेंबर २०१५मध्ये दिले होते. हीच माहिती लिखित स्वरूपात उच्च न्यायालयात सादर केली होती. काही ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. पण, ते सुरक्षारक्षक गांभीर नाहीत, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
या आठवड्यातच नांदेड आणि काल पुणे येथे मारहाणीचे प्रकार घडले. सरकार निवासी डॉक्टरांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत आहे का, असाच प्रश्न उपस्थित होत असल्याचे मार्ड पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉक्टर संरक्षण कायद्यातील तरतुदीत बदल करण्यात यावा, अशी मागणीही मार्डने केली आहे. या कायद्यांतर्गत आरोपीला एका दिवसात जामिनावर सोडले जाते. आरोपींना आठ दिवसांसाठी अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मार्ड लढा देत आहे. तरीही हा प्रश्न सुटला नसल्याने मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)