सात महिन्यांत ११६५ बालमृत्यू

By Admin | Updated: December 5, 2014 00:46 IST2014-12-05T00:46:04+5:302014-12-05T00:46:04+5:30

पूर्वीच्या तुलनेत बालमृत्यू आणि माता मृत्युदरात घट झाली, हे काही अंशी खरे आहे; परंतु हे मृत्यू रोखण्यात पाहिजे त्या प्रमाणात शासनाला यश आले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत

1165 infant mortality in seven months | सात महिन्यांत ११६५ बालमृत्यू

सात महिन्यांत ११६५ बालमृत्यू

मुलांची संख्या ६४२ तर मुली ५२३
सुमेध वाघमारे - नागपूर
पूर्वीच्या तुलनेत बालमृत्यू आणि माता मृत्युदरात घट झाली, हे काही अंशी खरे आहे; परंतु हे मृत्यू रोखण्यात पाहिजे त्या प्रमाणात शासनाला यश आले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यात मागील सात महिन्यांत पाच वर्षाखालील ११६५ बालकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, एक ते सात दिवसांच्या कालावधीतील बालकांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण २०१३मध्ये भारतात सर्वाधिक म्हणजेच सुमारे १.३४ दशलक्ष इतके राहिले आहे. १९९० मध्ये बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३३ दशलक्ष इतके होते. त्या तुलनेत २०१३ मध्ये हेच प्रमाण १.३४ दशलक्ष इतके कमी झाले आहे. १९९० ते २०१३ दरम्यान मृत्यूदरात मोठी घट झाली असली तरी जन्मदरातही तितक्याच मोठ्या प्रमाणात घट झाली. १९९० मध्ये जन्मदर एक हजारामागे ८८ इतका होता हेच प्रमाण २०१३मध्ये ४१ इतके कमी झाले आहे. यामध्ये १७ टक्के बालकांचे मृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीमुळे होतात तर १५ टक्के बालकांचे मृत्यू न्यूमोनियामुळे, ११ टक्के मृत्यू प्रसूतीदरम्यान, नऊ टक्के बालकांचे मृत्यू अतिसार, तर सात टक्के बालकांचे मृत्यू हे मलेरियामुळे होतात. महाराष्ट्रात बालमृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम), जननी सुरक्षा अभियान कार्यान्वित असतानाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य सेवा मंडळ, नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यामध्ये एप्रिल ते आॅक्टोबर यादरम्यान पाच वर्षांखालील एकूण १ हजार १६५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात मुलिंची संख्या ५२३ असून मुलांची संख्या ६४२ आहे. यामुळे या जिल्ह्यात बालमृत्यूवर आणखी काम होणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-एक ते सात दिवसांच्या अर्भक मृत्यूची संख्या मोठी
पाच वर्षाखालील बालकांमध्ये एक ते सात दिवसांच्या अर्भकांची संख्या मोठी आहे. मागील सात महिन्यात सहाही जिल्ह्यात या कालावधीत ३४२ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात २०७ मुले तर १३५ मुली आहेत. गोंदियात १३१, भंडाऱ्यात ६७, वर्धेत ६१, चंद्रपूरमध्ये ३२, गडचिरोलीत ३० तर सर्वात कमी नागपूर जिल्ह्यात २१ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोलीत आॅक्टोबर महिन्यात बालमृत्यूच नाही
आॅक्टोबर-२०१४मध्ये इतर सहा जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोलीत बालमृत्यूची नोंदच झालेली नाही. इतर पाच जिल्ह्यांमध्ये २०६ बालकांची नोंद आहे. यात सर्वात जास्त गोंदिया ६७, भंडाऱ्यात ५२, नागपुरात ३१, चंद्रपूरमध्ये २९ तर वर्धेत २७ बालमृत्यूची नोंद आहे.

Web Title: 1165 infant mortality in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.