१,११,१११ गणेशचित्रांचा विश्वविक्रम
By Admin | Updated: October 19, 2015 03:00 IST2015-10-19T03:00:03+5:302015-10-19T03:00:03+5:30
चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या ओंकारस्वरूप श्रीगणेशाचे १ लाख ११ हजार १११ रेखाचित्रांचे जगातील सर्वांत मोठे प्रदर्शन भरवून ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाने नवा विश्वविक्रम स्थापित केला.

१,११,१११ गणेशचित्रांचा विश्वविक्रम
औरंगाबाद : चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या ओंकारस्वरूप श्रीगणेशाचे १ लाख ११ हजार १११ रेखाचित्रांचे जगातील सर्वांत मोठे प्रदर्शन भरवून ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाने नवा विश्वविक्रम स्थापित केला. औरंगाबादच नव्हेतर जालना व बीड जिल्ह्यांतील सुमारे २६०पेक्षा अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी असामान्य कामगिरी करून दाखविली. उल्लेखनीय म्हणजे, मागील २३ दिवसांत ‘लोकमत’ने दुसरा विश्वविक्रम नोंदविला आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला १७ विद्यार्थ्यांनी ५३ मिनिटांत ४,४२५ गणेशचित्रे रेखाटून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.
‘लोकमत’तर्फे आयोजित व राजुरी स्टील प्रस्तुत आणि ‘एमकेसीएल’ व ‘लोकसेवा स्टेशनर्स’ प्रायोजित ‘आपले बाप्पा’ उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. १,११,१११ गणेशचित्रांचे विश्वविक्रमासाठी उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात १ लाख ६० हजार गणेशचित्रे पाठवून विद्यार्थ्यांनी अतूट विश्वविक्रम करण्याचा दृढनिश्चय पूर्ण केला. प्रोझोन मॉल येथे भरविण्यात आलेल्या व गणेशाच्या चित्रांचे जगातील सर्वांत मोठ्या प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्याचा बहुमान विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आला.
व्यासपीठावर ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, मानवविकास आयुक्त भास्कर मुंढे, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, विक्रीकर सहआयुक्त डी. एम. मुगळीकर, पुरवठा उपआयुक्त वर्षा ठाकूर, विमानतळ प्राधिकरणचे संचालक आलोक वार्ष्णेय, उपआयुक्त विजयकुमार फड, पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे, म्हाडाचे मुख्य अधिकारी अनिल रामोड, आदर्श महिला बँकेचे संस्थापक अंबादास मानकापे, राजुरी स्टीलचे पंकज पांडे, एमकेसीएलचे विभागीय समन्वयक बालकिशन बलदवा, लोकसेवा स्टेशनर्सचे अविनाश फरसुले, प्रोझोन मॉलचे अनिल इरावणे, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी रेखा सिंग, जिल्हा गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, संजय बारवाल, नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, रेखाचित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांमधील प्रातिनिधिक स्वरूपात ११ विद्यार्थ्यांचा राजेंद्र दर्डा यांनी सत्कार केला. त्यात राधिका कासार, उमंग काला, दीपाली कदम, श्रुती जाधव, प्रिया मालेवार, आर्यन वाढे, श्रावणी आहेर, मीनाक्षी रोडगे, तन्मय पवार, गायत्री मैड, राधिका म्हस्के, गौरी अग्रवाल, आकांक्षा शिंदे, सोहन आहेरकर, आरती कोटिया, श्रुती तांबोळी, निकिता सदाफुले व प्रतीक्षा पालवे यांचा समावेश होता.
सुमारे ५० हजार चौ. फूट जागेवर हे विश्वविक्रमी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यातून कल्पकतेची चुणूक बघण्यास मिळाली. ओम्काराची लाखो रूपे साकारताना एकही रूप सारखे नव्हते, हे विशेष. विद्यार्थ्यांनी लाडका बाप्पा कॅन्व्हॉसवर रेखाटला आहे. पारंपरिकच नव्हे, तर आधुनिक रूपातही गणराया बघण्यास मिळत आहे. यात ‘ओ माय फ्रेंड गणेशा, तू रहेना साथ हमेशा’ अशी सादही चित्रातून बाप्पाला घालण्यात आली होती. शालेय गणवेशातील बाल गणेश, महादेवाची पिंड खांद्यावर घेऊन जाणारा बाहुबली गणेश, गिटार वाजविणारा गणेश, टीम इंडियात क्रिकेट खेळणारी मंगलमूर्ती, तर काहींनी आईच्या अक्षरातून गणेश साकारला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा आविष्कार पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)
‘हिप हॉप डान्सर’ सुरेश मुकुंद याने ढोलताशाच्या गजरात प्रेक्षकांमधून दमदार एंट्री केली. त्याच्याशी हात मिळविण्यासाठी व सही घेण्यासाठी चाहते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. सुरेशने विश्वविक्रमाबद्दल लोकमत, सर्व शाळा व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
१७वर्षीय हृतिक गुप्ता याने आपल्या लवचीक अंगाने सादर केलेल्या कवायतींमुळे सर्व जण चकित झाले. कार्यक्रम संपल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडाच घातला. ‘आरती क्रिएशन डान्स ग्रुप’च्या कलावंतांनी गणरायाच्या स्तुतीपर गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. साई वादळ ढोल पथकानेही रसिकांची मने जिंकली.
>दोन दिवस प्रदर्शन
उद्घाटनानंतर रविवारी शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. सोमवारी आणि मंगळवारी प्रोझोन मॉल येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
>न भूतो न भविष्यती विश्वविक्रम
गणपती या देवतेच्या संकल्पनेवर आधारित ‘लोकमत’ने भरविलेल्या
१ लाख ११ हजार १११ गणेश रेखाचित्रांच्या प्रदर्शनाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असाच उल्लेख या विश्वविक्रमाचा करावा लागेल. यापूर्वी चित्रप्रदर्शनाची विश्वविक्रमात नोंद झाली; पण एवढ्या प्रचंड प्रमाणात रेखाचित्रांचे हे जगातील एकमेव प्रदर्शन ठरले आहे. या माध्यमातून ‘लोकमत’ने औरंगाबादेतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना विश्वविक्रमात सहभागी होण्याचा मान मिळवून दिला.
- रेखा सिंग, प्रतिनिधी, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड