१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - पृथ्वीराज चव्हाणांची टीका
By Admin | Updated: September 2, 2014 16:02 IST2014-09-02T15:45:52+5:302014-09-02T16:02:28+5:30
मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नसून या सरकारने संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - पृथ्वीराज चव्हाणांची टीका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - 'अच्छे दिन आयेंगे' असे सांगत जनसामान्यांवर आश्वासनांची बरसात करणा-या मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नसून त्यांनी संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी मोदी केंद्रात एकाधिकारशाही करत असून त्याचा फटका ज्येष्ठ नेत्यांनाही बसल्याचे म्हणाले.
केंद्रात मंत्र्यांची संख्या कमी केली, खासगी सचिव नेमण्याचा अधिकारही कोणालाही देण्यात आलेला नाही, मंत्र्यावर पाळत ठेवली जाते, हा सर्व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जनतेला 'चांगल्या दिवसांची ' स्वप्ने दाखवणा-या सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केली, रेल्वेचे तिकीटदरही मोठ्या प्रमाणात वाढवले, त्यामुळे हे सरकार 'गरिबांचे नव्हे तर धनदांडग्यांचे आहे', हे दिसत आहे असे ते म्हणाले.
मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना कस्पटासमान लेखून संसदीय बोर्डातून बाहेर काढल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यपालांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली व नवीन राज्यपालांची नेमणूक या सर्वांमुळे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी '५ सप्टेंबर' रोजी पंतप्रधानांचे भाषण सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्याच्या निर्णयवरही टीका केली. विद्यार्थ्यांनी आपलं भाषण ऐकलंच पाहिजे अशी सक्ती पंतप्रधानांनी केल्याची बाब चुकीची असल्याचे सांगत मुलांच्याबाबतीत अशी प्रपोगंडा करण्याची पद्धत अयोग्य असल्याचे चव्हाण म्हणाले.
भीषण ऊर्जाटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पंतप्रधानांनी स्वत: सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायला हवी अशी मागणी आपण केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वीजटंचाई टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पंतप्रधान मुंबईत आले त्यावेळी आपण प्रत्येकवेळी प्रोटोकॉल पाळला. परंतु सभेमध्ये मी उपस्थित केलेल्या महत्वाच्या मुद्यांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच आपल्या भाषणाच्यावेळी हेतुपुरस्सर व नियोजनपूर्वक हुल्लडबाजी केल्याचा आरोप पुन्हा चव्हाण यांनी केला. हे प्रकार महाराष्ट्र, झारखंड व हरयाणामध्ये झाले आणि त्यामुळेच हे उच्चस्तरावरून जाणीवपूर्वक केल्याचे दिसत आहे असे चव्हाण म्हणाले.
एकंदरच निवडणुकीच्यावेळी केलेल्या घोषणा, जाहिरातबाजी हे फक्त देखावे असून लोकांना दाखवलेले ' अच्छे दिनांचे स्वप्न' प्रत्यक्षात येताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.