100 crore of sand stolen from 103 acres in Wardha district | मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला भ्रष्टाचाराचे ग्रहण; 'समृद्धी'च्या कंपनीकडून १०० कोटींच्या मुरुमाची चोरी

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला भ्रष्टाचाराचे ग्रहण; 'समृद्धी'च्या कंपनीकडून १०० कोटींच्या मुरुमाची चोरी

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे कंत्राटदार व उपकंत्राटदार बेकायदशीर मुरुम उत्खनन करून गब्बर होत असल्याचे उदाहरण वर्धा जिल्ह्यात उघडकीस आले आहे. या प्रकरणात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स ही मुख्य कंत्राटदार कंपनी व तिची उपकंत्राटदार एमपी कन्स्ट्रक्शने हैदराबादच्या कोझी प्रॉपर्टीजच्या वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील तब्बल १०३ एकर जमिनीतील शेकडो कोटींचा मुरुम चोरून नेल्याचे समोर आले आहे.


अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी व तिची उपकंत्राटदार कंपनी एमपी कन्स्ट्रक्शन्स, सेलू यांच्याविरोधात वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलिसांनी कोझी प्रॉपर्टीजचा जवळपास १०० कोटींचा मुरुम चोरल्याबद्दल गुरुवारी एफआयआर दाखल केला.
त्यात पोलिसांनी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सेलूचे प्रकल्प अधिकारी अनिलकुमार व एमपी कन्स्ट्रक्शन्सचे मालक आशिष दप्तरी यांची संशयित आरोपी म्हणून नोंद केली आहे व त्यांच्या विरोधात ३७९, ४२७, २० ब व ३४ या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर हे तपास करीत आहेत. कोझी प्रॉपर्टीज प्रा.लि.चे अधिकृत स्वाक्षरीकर्ता नीलेश सिंग यांच्या ३० जुलै, २०१९ च्या तक्रारीवर सेलू पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एमपी कन्स्ट्रक्शन्सचे आशिष दप्तरी बेपत्ता झाल्याचे कळते.


या गुन्ह्याची माहिती अशी की, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे ५९ किमीचे बांधकाम कंत्राट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले आहे. एकूण ३,२२० कोटींचे हे काम आहे. हा ५९ किमीचा टप्पा वर्धा जिल्ह्यात आहे.
कोझी प्रॉपर्टीजची केळझर व गणेशपूर (जि. वर्धा) येथे १००० एकर जमीन असून, समृद्धी महामार्गाचा जवळपास १.५० किमी भाग या जमिनीतून जातो. ही जमीन वर्धा जिल्ह्यातील सेलू व सिंदी या दोन पोलीस स्टेशनअंतर्गत येते. यापैकी ६३ एकर जमीन सेलू पो.स्टे. व ४० एकर सिंदी पो.स्टे.अंतर्गत येते.


१०३ एकर जमिनीतून मुरुम चोरी
अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने हे कंत्राट पूर्ण करण्यासाठी १० ते १२ उपकंत्राटदर नेमले असून, एमपी कन्स्ट्रक्शन ही त्यापैकी एक कंपनी आहे व तिला कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीवर १.५० किमी बांधकामाचे उपकंत्राट मिळाले आहे.
गेल्या महिन्यात कोझी प्रॉपर्टीजच्या अभियंत्यांनी या जमिनीला भेट दिली, त्यावेळी जवळपास १०३ एकर जमिनीवर ५ ते ३० फूट खोल खड्डे करून मुरुम चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

गावकऱ्यांकडे चौकशी केली असता, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अवजड यंत्राचा उपयोग करून एमपी कन्स्ट्रक्शन्सने मुरुम खोदून नेल्याचे आढळले. जवळपास दोन महिन्यांपासून ही चोरी होत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.
या गंभीर चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने वर्ध्याचे जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलीस स्टेशन येथे ३० जुलै २०१९ रोजी करण्यात आली. या चोरीची चौकशी वर्ध्याच्या भूमापन विभागाने केल्यावर १०३ एकर जमीन खोदून मुरुम चोरल्याचे उघड झाले. हा मुरुम जवळपास २० लाख ब्रास असून, त्याची किंमत जवळपास १०० कोटी असल्याचे कळते. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गासाठी विशेष बाब म्हणून राज्य सरकारने खासगी जमिनीतून मुरुम काढल्यास रॉयल्टी माफ केली आहे. परंतु त्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकाºयांकडून पूर्वपरवानगी घेऊन खोदकाम करावे लागते. कोझी प्रॉपट्रीजने खनिकर्म अधिकाºयांकडे चौकशी केली असता, एमपी कन्स्ट्रक्शन्सने मुरुम खोदण्याची परवानगी तर दूर पण त्यासाठी अर्जही न केल्याचे पत्रच खनिकर्म अधिकाºयांनी दिले. एमपी कन्स्ट्रक्शन्सने खनिकर्म विभागाची परवानगी न घेताच जवळपास १०० कोटींचा मुरुम चोरून नेला, हे स्पष्ट आहे.


यामध्ये खरा लाभार्थी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच असल्याचे कळते. पण पोलिसांनी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी व एमपी कन्स्ट्रक्शन्सच्या मालकांवरच गुन्हा दाखल केला. चोरीच्या मुरुमातून अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने शेकडो कोटी कमावल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. त्यामुळे या कंपनीच्या संचालकांवरही कारवाई होणे आवश्यक आहे.


यासंबंधी संपर्क केला असता वर्धेचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. आय. के. शेख यांनी कोझी प्रॉपर्ट्रीजची तक्रार मिळाल्याचे सांगितले. समृद्धी महामार्गाचा कॉरिडॉर ३१ ते ८९ आहे व मुरुमाच्या अवैध उत्खननाच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकाºयांनी वर्धा व आर्वीच्या उपविभागीय अधिकाºयांच्या दोन समित्या नेमल्या आहेत व त्यांना सोमवारपर्यंत चौकशी अहवाल देण्यास सांगितले आहे; त्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करू, असे डॉ. शेख म्हणाले. यापूर्वीदेखील अशाच तक्रारी अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्ध मिळाल्या होत्या. आता परत अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरविरूद्ध तक्रारी आल्याने जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, अशीही माहिती डॉ. शेख यांनी दिली.


जुलैमध्ये तक्रार
या गंभीर चोरीची तक्रार कोझी प्रॉपर्टीजने वर्ध्याचे जिल्हाधिकारी व ठाणेदार सेलू पोलीस स्टेशन येथे ३० जुलै २०१९ रोजी करण्यात आली. या चोरीची चौकशी वर्ध्याच्या भूमापन विभागाने केल्यावर १०३ एकर जमीन खोदून मुरुम चोरल्याचे उघड झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 100 crore of sand stolen from 103 acres in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.