मुंबई : सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी येथे दिली. पोलीस कोठडीत यापुढे मृत्यू होऊ नयेत, यासाठी गृह खात्याची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून, त्यावर चर्चा करून काय सुधारणा करता येतील यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.आपण सांगलीत जाऊन कोथळे कुटुंबीयांची भेट घेतली असून कोथळे कुटुंबीय व या प्रकरणातील दुसºया परिवारास पोलीस संरक्षण पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याच्या कोथळे कुटुंबीयांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून योग्य दिशेने सुरू आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नसेल तरच सीबीआयमार्फत चौकशी केली जाईल.या प्रकरणाचा सर्व तपास हा २४ तासांच्या आत लागला असून नि:पक्षपाती चौकशी केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले.
सांगलीतील कोथळे कुटुंबीयांना १० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:57 IST