भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना मध्य प्रदेशात बांधकामांवर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 10:00 IST2023-06-08T09:59:12+5:302023-06-08T10:00:17+5:30
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळजवळील सलकानपूर धाम या धार्मिक स्थळाचे मागील आठवड्यात भूमिपूजन केले होते.

भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना मध्य प्रदेशात बांधकामांवर भर
अभिलाष खांडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ : मागील वर्षी मध्यप्रदेश सरकारने ९०० कोटी रुपये खर्चून, आता वादग्रस्त ठरलेल्या उज्जैनच्या महांकाल लोक परिसराचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण केले होते. त्यानंतर आता कोट्यवधी रुपये खर्चून आणखीही काही मंदिरांभोवती नूतनीकरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळजवळील सलकानपूर धाम या धार्मिक स्थळाचे मागील आठवड्यात भूमिपूजन केले होते. आता ओंकारेश्वर येथे ७०० कोटी रुपये खर्चून दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार आहे. शंकराचार्यांच्या पुतळ्याचे निवडणुकीपूर्वी अनावरण होण्याबरोबरच पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सलकनपूर देवी मंदिराच्या परिसराचे २०२५पर्यंत २११ कोटी रुपये खर्चून सौंदर्यीकरण केले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
याचा अर्थ लक्षात घ्या
- त्यानंतर लगेच महांकाल लोक येथील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबतचे आरोप वाढले. तेथील वादळात अनेक धार्मिक प्रमुख व ऋषींच्या पुतळ्याचे नुकसान झाले. यामुळे तेथील भ्रष्टाचार उघडा पडला.
- अलीकडेच गृहनिर्माण महामंडळाच्या उपअभियंत्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण देशभरात गाजले होते.
- सचिवालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, दुष्काळाप्रमाणेच उज्जैन किंवा ओंकारेश्वर येथील मोठ्या प्रकल्पांमुळे राजकारणी, अभियंते आणि इतर अधिकारी आनंदी झाले आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल.