सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:49 IST2025-03-20T12:48:32+5:302025-03-20T12:49:55+5:30
भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.

सर्वच महामार्गावर लेडिज टॉयलेट; बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
मुंबई : राज्यातील महामार्गावर, तसेच शहरातील हॉटेलसह पेट्रोलपंप याठिकाणी महिलांसाठी स्वच्छ व चांगली स्वच्छतागृहे असणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील सर्वच महत्त्वाच्या रस्त्यांवर महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
भाजप आ. चित्रा वाघ यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान महिलांच्या स्वच्छतागृहांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते.
राज्यभर असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या, त्यांची दुरवस्था आणि तेथे सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना गर्भाशयाचा कर्करोगासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा राज्यभर उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी आ. वाघ यांनी केली. त्यावर मंत्री भोसले म्हणाले की, स्वच्छतागृहांची देखभाल होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी राज्य सरकारमार्फत नियोजन करण्यात येत आहे.
महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुलभ इंटरनॅशनलसारख्या एखाद्या संस्थेला देणे किंवा जवळच्या गावातीलच महिला बचत गटास त्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून देणे आणि त्या बचत गटानेच या स्वच्छतागृहाची देखभाल करणे, असा स्वरुपाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ. चित्रा वाघ यांच्या प्रश्नावर सांगितले.
स्वच्छतागृहांची दर १५ दिवसांनी तपासणी
पेट्रोल पंपांच्या ठिकाणी व महामार्गावरील हॉटेल्समध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहांची महानगरपालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांमार्फत दर पंधरा दिवसांनी तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येतील.
महानगरपालिका, नगरपालिका यांच्या हद्दीत स्वच्छतागृह उभारणे, त्यांची देखभाल करण्यासाठी संबंधित यंत्रणांना पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.