Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून पळालेला चित्ता 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्योपूरजवळ आढळला. चार दिवस फेरफटका मारल्यानंतर चित्ता नुकताच जंगलात परतला. मात्र, जंगलात परतण्यापूर्वी तो काल मध्यरात्री शहरातील रस्त्यावर फिरताना दिसला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्याने गेल्या शनिवारी कुनोची हद्द सोडून 90 किलोमीटरचे अंतर कापले अन् श्योपूर शहराला लागून असलेल्या धेंगडा गावात शिरला. चार दिवसांपासून तो याच परिसरात फिरत होता. ट्रेकिंग टीम 24 तास या बिबट्यावर नजर ठेवून होती. दरम्यान, काल मध्यरात्री हा शहरातील वीर सावरकर स्टेडियमजवळ दिसला. त्यानंतर तो श्योपूर शिवपुरी महामार्गावरून निघाला अन् जिल्हाधिकारी कार्यालय, इको सेंटर मार्गे बावंडा नाल्यापर्यंत धावत गेला.
ट्रेकिंग टीमचे वाहन चित्त्याच्या मागावर बुधवारी मध्यरात्री चित्ता शहरात फिरत असताना कुनोतील ट्रेकिंग त्याच्या मागवरच होती. चित्ता जिथे-जिथे जात होता, टीम त्याच्या मागे जात होती. शहरात फेरफटका मारुन झाल्यावर अखेर हा अग्नी नावाचा चित्ता जंगलात परतला. तर, त्याचा भाऊ वायूदेखील इतर भागात फिरत आहे. या दोन्ही बिबट्यांना दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथे आणण्यात आले असून, 4 डिसेंबर रोजी मोकळ्या जंगलात सोडण्यात आले होते. हे दोघे भाऊ नेहमी सोबत राहतात, एकत्र शिकार करतात आणि शिकार वाटून खातात. दोघे पहिल्यांदाच कुनोच्या राखीव क्षेत्राबाहेर वेगवेगळ्या दिशेने गेले आहेत, त्यामुळे टीम दोघांवरही लक्ष ठेवून आहे. आता दोघंही एकमेकांचा शोध घेत कुनोपर्यंत पोहोचतील अशी आशा आहे.