'कुनो' पार्कमधील चित्त्यांचे मृत्यू का होतायत? तज्ज्ञांच्या दाव्यावर सरकार म्हणे- शक्यच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 06:46 PM2023-07-16T18:46:53+5:302023-07-16T18:48:12+5:30

गेल्या काही महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 5 चित्ते आणि 3 पिल्लांचा मृत्यू

cheetahs in kuno national park death due to radio collars Pm Modi government statement came after expert claims | 'कुनो' पार्कमधील चित्त्यांचे मृत्यू का होतायत? तज्ज्ञांच्या दाव्यावर सरकार म्हणे- शक्यच नाही!

'कुनो' पार्कमधील चित्त्यांचे मृत्यू का होतायत? तज्ज्ञांच्या दाव्यावर सरकार म्हणे- शक्यच नाही!

googlenewsNext

Kuno National Park, Cheetah Deaths: मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 5 चित्ते आणि 3 पिल्लांचा मृत्यू झाला आहे. याच आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवारी 2 नर चित्ते (तेजस आणि सूरज) मरण पावले. यानंतर चित्त्यांच्या गळ्यात बांधलेल्या रेडिओ कॉलरबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. कारण, दक्षिण आफ्रिकेतील चित्ता या प्राण्याबाबतचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञाने वृत्तसंस्थेशी बोलताना दावा केला की रेडिओ कॉलरमुळे चित्ता सेप्टिसिमियाला बळी पडत आहेत. यावर आता सरकारचे विधान आले असून ते पूर्णपणे वेगळे आहे.

सेप्टिसीमिया हे एक गंभीर रक्त संक्रमण आहे आणि त्यामुळे रक्तामध्ये विष तयार होऊ लागते. असे म्हटले जाते की प्राण्यांच्या शरीराच्या बाहेरील भागात जास्त काळ ओलावा राहिल्याने संसर्ग सुरू होतो आणि तो सेप्टिसिमियाचे रूप घेतो. गळ्यात रेडिओ कॉलर लावल्यामुळे तेजस आणि सूरज चित्ता यांना सेप्टिसिमिया झाला आणि त्यांचा मृत्यू झाला, असा दावा दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञाने केला होता. त्यावर, रेडिओ कॉलरद्वारे चित्तांचा मृत्यू झाल्याचा दावा कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नसून ते अनुमान आणि अफवांवर आधारित आहेत, असे स्पष्टीकरण मोदी सरकारकडून देण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील चित्ता-तज्ज्ञ काय म्हणाले?

दक्षिण आफ्रिकेतील चित्ता मेटापोप्युलेशन तज्ज्ञ व्हिन्सेंट व्हॅन डर मर्वे यांनी मंगोलियातील वृत्तसंस्थेला सांगितले, "रेडिओ कॉलर दमट वातावरणात संसर्गास कारणीभूत ठरत आहेत. दोन्ही चित्ते सेप्टिसिमियामुळे मरण पावले आहे. त्यांना शरीराच्या बाहेरील भागात कोणत्याही खुल्या जखमा नव्हत्या. ते त्वचारोग आणि मायियासिसचे प्रकरण होते. त्यानंतर सेप्टिसीमिया येतो."

सरकारकडून स्पष्टीकरण काय?

केंद्र सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये चित्त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रोजेक्ट चीता सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. या अंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 रेडिओ कॉलर चित्ते भारतात आणण्यात आले. अनिवार्य क्वारंटाईन कालावधीनंतर, सर्व चित्त्यांना मोठ्या अनुकूलन एन्क्लोजरमध्ये हलविण्यात आले. सध्या, 11 चित्ते जंगलात आहेत आणि 5 चित्ते विलगीकरणात आहेत, ज्यात भारतीय भूमीवर जन्मलेल्या एका पिल्लाचा समावेश आहे. प्रत्येक बिबट्यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आपसातील भांडणं, रोग, सुटका होण्यापूर्वीचे आणि नंतरचे अपघात, प्राण्यांची शिकार करताना झालेल्या दुखापती, शिकारी, विषबाधा आणि शिकार्‍यांचे हल्ले इत्यादींमुळे चित्त्याचा मृत्यू होऊ शकतो. प्राथमिक विश्लेषणानुसार सर्व मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये रेडिओ कॉलर इत्यादींना चित्त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. असे अहवाल कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नसून ते अनुमान आणि अफवांवर आधारित आहेत. चित्त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातील आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ञ/पशुवैद्यकांकडून नियमितपणे सल्ला घेतला जात आहे, असे निवेदनात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत 'कुनो'मध्ये झालेले मृत्यू

  • नामिबियातून आणलेल्या ज्वाला (सिया) या मादी चित्त्याने 24 मार्च रोजी 4 पिल्लांना जन्म दिला.
  • 23 मे रोजी एका पिल्लाचा मृत्यू झाला.
  • 25 मे रोजी आणखी दोन पिल्लांचाही मृत्यू झाला.
  • 9 मे रोजी मादी चित्ता दक्षा जखमी अवस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
  • 23 एप्रिल रोजी उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला.
  • 26 मार्च रोजी देखील मादी चित्ता साशाला किडनी संसर्ग झाला होता, उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.
  • 10 जुलै रोजी तेजस चित्त्याचा मृत्यू झाला.
  • 21 जुलैला सूरज चित्त्याचा मृत्यू झाला.

(तेजस आणि सूरजच्या मृत्यूवेळी मानेवर व पाठीवर जखमा होत्या, त्यात किडे शिरले होते.)

Web Title: cheetahs in kuno national park death due to radio collars Pm Modi government statement came after expert claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.