आठवतंय.... माझ्या लहानपणीरंगपंचमीलाच मोठ्या धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते असे. चुकूनही धुलिवंदनला रंग खेळणारे कुणी दिसत नसत. समजा कुणी दिसलेच तर घरातली, आजूबाजूची वडीलधारी माणसे त्यांचे चांगलेच कान उपटत. रंगपंचमी अजून लांब आहे, तेव्हा खेळ रंग असे सांगत. पण गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बदलतोय. हळूहळू रंगपंचमी ऐवजी धूलिवंदन साजरे करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ.
शाळा , कॉलेज, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी धुलिवंदनलाच सुट्टी असते. त्यामुळे त्याच दिवशी रंग खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुद्धा रंगपंचमी आणि धूलिवंदन यातले धूलिवंदनच जवळ वाटते. रंगपंचमी कधी येते आणि कधी जाते याची त्यांना कल्पना देखील नसते. धुळवड वेगळी आणि रंगपंचमी वेगळी, हा फरकही अनेकांना माहीत नसेल. या सर्व बदललेल्या परिस्थितीत आपण तरी निदान आपल्या सणांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. प्रांताप्रांतात भेदाभेद करणे हा मुद्दाच इथे नाहीये. पण कुठे तरी आपल्या सणांवर गदा येत आहे याचे शल्य मनात घर करून आहे.
पुणे - मुंबई सारखी शहरे सोडा आता तर खेडेगावांकडे सुद्धा धुलिवंदनलाच रंग खेळले जातात. असेच वातावरण कायम राहिले तर महाराष्ट्रीय सण काळाच्या पडद्याआड जायला वेळ लागणार नाही. पण या सणांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे म्हणा. सर्व जण आपापल्या पोटापाण्याच्या धावपळीत व्यग्र आहेत. सण , उत्सवांचे महत्त्व फक्त सुट्टीचा आनंद आणि गोड- धोड खाण्यापुरतेच मर्यादित उरलेय का, असेही काही वेळा मनात येऊन जाते.