International Tea Day history types and craze of tea | International Tea Day: एक गरम चाय की प्याली हो...

International Tea Day: एक गरम चाय की प्याली हो...

- भक्ती सोमण

चहा. दिवसाची सुरूवात प्रसन्नतेने करण्यासाठी अत्यंत महत्वाचा. थंडीच्या दिवसात तर त्याची गरज जास्त असते. पाण्यात साखर, चहा, आलं घालून उकळल्यावर त्याच्या सुगंधानेच उत्साह संचारतो. तर चहा पिताना तो आणखी द्विगुणीत होतो. असा हा अमृततुल्य चहा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. म्हणून तर दिवसातूून कितीही वेळा चहा प्यायची अनेकांची तयारी असते.

जगात पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायला जातो तो चहाच. अगदी साधच उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्या उठल्या पितानाचा चहा, घरचं काम आटोपताना मध्येच हुक्की आली म्हणून प्यावासा वाटणारा चहा, ऑफिसमध्ये गेल्यावर मिळणारा चहा आणि टपरीवरचा चहा... अशा कितीतरी रूपात हा चहा आपल्याला दिवसभर भेटत असतो. महत्वाचे म्हणजे या प्रत्येक चहाचा रंग-ढंग वेगळाच असतो. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर वेगळीच असते. तो चहा कसा करतात ते बघितलं की तो प्यावासाच वाटणार नाही. पण काचेच्या ग्लासातला त्या चहाचा घोट प्यायलावरच त्याची खरी मजा कळते. म्हणून तर कामगारांपासून ते सुटबुटवाल्यांनाही या चहाची भुरळ पडतेच पडते.

पण चार मित्र एकत्र येणार असतील किंवा खूूप गप्पा मारायच्या असतील तर कॉफीच प्यायला हवी असा एक गेल्या काही काळापासून शिरस्ता आहे. या कारणामुळे म्हणा किंवा कॉफीच्या विविध प्रकारांमुळे म्हणा कॉफीला ग्लॅमर प्राप्त झालं. त्यामुळे अनेक कॉफीशॉप्स, कॅफेज उघडले गेले. मात्र, जगभरात जास्त प्यायल्या जाणारा हा चहा पिण्यासाठी आसुसलेला वर्ग मात्र टपरीवर चहा पिण्यातच मजा घ्यायचा. किंबहुना चहाची ओळख ही टपरीपुरतीच मर्यादित होती. जसंजसं ग्लोबलायझेशन वाढायला लागलं, लोकांच्या परदेशी फेऱ्या व्हायला लागल्या तसं लोकांना चहाचे असंख्य प्रकार आहेत हे कळू लागलं. त्याचओढीतून गेल्या २-३ वर्षात हळूहळू चहा शॉप्स सुरू झाले आणि चहाला ग्लॅमर प्राप्त झालं. याविषयी 'टी ट्रेल' या चहा शॉप साखळीचे प्रोडक्ट हेड असलेले शेफ अमित तिवारी म्हणाले की, . त्यांना चहा पिण्यासाठी टपरी किंवा कॉफी शॉप्स सोडून दुसरा पर्याय मिळत नव्हता. असे चहा शॉप सुरू झाल्यावर त्यांना पर्याय मिळाला.
पर्यायाने चहाचे असंख्य प्रकारही प्यायला मिळाले. सतत नाविन्याच्या शोघात असलेल्या लोकांना चहा शॉप्सची ही थीम आणि चव अत्यंत आवडली. याचमुळे आता चहाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त झाले आहे. टपरीवचा चहा पिणारा माणूस आता चहा शॉपमध्ये येऊन विविध प्रकारचे चहा तर पितोच शिवाय त्याला पदार्थही खाता येतात. त्यामुळे मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी कॉफी शॉपमध्ये बसणारा वर्ग आता चहा शॉपकडे वळू लागला आहे. एक चांगला पर्याय लोकांना मिळाल्याने चहाकडे बघण्याच्या दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे. त्यामुळे चहालाही एक दर्जा, ग्लॅमर मिळालं आहे.

ब्रिटीशांच्या काळापासून चहा भारतात आहेच. पण, आपण पितो तो चहा आणि बाहेर निर्यात करतो तो चहा यात खूप फरक आहे. तो निर्यात करणारा आसाम, दार्जिलिंगचा अस्सल चहा आता इथल्या चाय शॉप्समध्ये मिळायला लागला आहे. याशिवाय अर्जेंटिना, साऊथ आफ्रिकेचा रेड चहा, जपानी चहा, ब्रिटीश पितात तो चहा असे काही जगभराते चहाही अशा शॉप्समध्ये मिळतात, आणि ते प्यायला लोकांना आवडते, असेही अमित यांनी सांगितले.

आजकाल ग्रीन टी, ब्लॅक टी असे बिनदुधाचे चहा आरोग्याच्या दृष्टीने चांगले म्हणून पिण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या चहाची चव प्रत्येक ठिकाणी वेगळी लागते. कघीकधी तर असे चहा कडू पण लागतात. या प्रश्नावर अमित म्हणाले की, ग्रीन टी, उलॉंग टी, ब्लॅक टी असे चहा आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे प्रमाण वाढले असले तरीतो कसा करायचा हेच लोकांना माहित नसते. प्रत्येक चहा उकळण्याचं विशिष्ट तापमान (टेम्परेचर) असतं. तेवढाच तो उकळवला तर तो फक्कड जमतो. ते गणित जमावचं लागतं, असंही अमित म्हणाले.
जगभरात हजार प्रकारचे चहा आहेत आणि ते करण्यासाठी विविध हर्बस, स्पाईसेस यांचा वापर केला जातो. ते आता भारतातही सहज मिळायला लागले आहे. किंबहुना लोकांची टेस्ट बदलत चालली आहे. चहा करताना केलेली कॉम्बिनेशन्स त्यांना आवडत आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे. आणि हाच बदल कंपन्यांनी पकडला आहे. या दृष्टीकोनातून चहाला ग्लॅमर आल्याचं फूड एक्सपर्ट शुभा प्रभू साटम यांनी सांगितले.

चहा कुठेही प्यायला तरी त्यातून मिळणारं समाधान हे जास्त महत्वाचं असतं. सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि समरसून जगायचा असेल तर चहावाचून पर्याय नाहीच! बरोबर ना!

चहाचा इतिहास- असं म्हणतात की, इ.स. २७३७पूर्वी चीनचा सम्राट शैन नुंग यांनी उकळते पाणी गार करत ठेवले होते. तेव्हा काही पानं येऊन पडली. त्या पानांमुळे पाण्याला विशिष्ट असा रंग आला. अतिशय वेगळी असलेली ती चव सम्राटाला आवडली. तेव्हापासूनच चहाचा प्रसार सुरू झाला. सन ३५०ला चहा पिण्याचा पहिला उल्लेख तज्ज्ञांना सापडला. १६१०नंतर हळूहळू पाश्चात्त्य देशात चहाचा प्रसार व्हायला लागला. परदेशात तर चहा चांगलाच रूळला आहे. मात्र, भारताचा विचार करायचा झाल्यास, आसामच्या खास पत्तीयोसे बनलेल्या या चहाचा भारतात शोध लागला तो १८१५ साली. आसाममधले स्थानिक कबाईली लोक चहाची पाने उकळून पितात हे इग्रजांच्या लक्षात आले. मध्ये बराच काळ गेला. त्यानंतर भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत एक समिती स्थापन केली. त्यानंतर १८३५ साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनीच भारतीयांना चहा पिण्याची सवय लावली.

फेमस चहा कॅफे
ताजमहाल टी हाऊस, चायोज, टी व्हिला, वाघ बकरी टी लाऊंज, अरोमा, टीपॉट कॅफे, टी पॅलेस यु मी एण्ड चाय कप्पा अशा ठिकाणी मिळणारे चहा हे ८० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंत आहेत. इथे मिळणाºया प्रत्येक चहाची चव वेगवेगळी आहे. चहाप्रेमींची गर्दी अशा ठिकाणी आता आवर्जून दिसते.

फेमस चहा- मसाला चाय, कुल्हड चाय, हनी लेमन टी, आइस टी, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, स्ट्रोबरी, मिंट, चॉकलेट, बबल टी अशा प्रकारांमध्ये अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत.

चहा खाऊया
चहाच्या पानांचा उपयोग आता खाद्यपदार्थातही केला जात आहे. सलाडमध्ये ग्रीन टीच्या पानांचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी तर चहाचा उपयोग करून केलेले सूपही मिळते. तसेच डेझर्ट,आईस्क्रीम स्मूदीज, चहाचा कोल्ड शेक असे विविध प्रकार आता चहाच्या पानांपासूून मिळतात. मुंबईतल्या काही टी लाऊंजेसमध्ये हे प्रकार खायला मिळतात.

 

Web Title: International Tea Day history types and craze of tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.