Gudi Padwa 2018: विस्मृतीत चाललेल्या 'या' वड्या नववर्षात करून पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 00:38 IST2018-03-18T00:38:52+5:302018-03-18T00:38:52+5:30
कालौघात - फास्ट फूडच्या जमान्यात आपण अनेक पारंपरिक, चवदार-चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ विसरत चाललोय.

Gudi Padwa 2018: विस्मृतीत चाललेल्या 'या' वड्या नववर्षात करून पाहाच!
- मंगला पाटणकर
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. गुढी ही आपल्या संस्कृतीचं, संस्कारांचं, विजयाचं प्रतीक. आपल्या संस्कृतीत खाद्यसंस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, कालौघात - फास्ट फूडच्या जमान्यात आपण अनेक पारंपरिक, चवदार-चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ विसरत चाललोय. यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने असेच काही विस्मृतीत चाललेले पदार्थ खास तुमच्यासाठी... हे पदार्थ बनवून खाण्याचा संकल्प आजच करा!
खांडवी (वड्या)
साहित्यः एक वाटी गव्हाचा जाडसर रवा, गूळ (चिरलेला) सव्वा वाटी, नारळ (खवलेला) अर्धी वाटी, तूप, वेलदोड्याची पूड, दोन वाट्या पाणी
कृतीः रवा तुपावर (दोन मोठे चमचे तूप) भाजून घ्यावा. दोन वाट्या पाण्यात गूळ व चवीपुरते मीठ, नारळ घालून उकळी आणावी. नंतर त्यात भाजलेला रवा, वेलदोडा पूड घालून दोन-तीन वाफा आणून ढवळून झाकण ठेवावे. नंतर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण जाडसर (पाव इंच) पसरून व थोडा नारळ सगळीकडे पसरून वड्या पाडाव्या.
अशीच खांडवी तांदुळाच्या किंवा वरीच्या रव्याचीही करता येते.