निराधार महिलेच्या मदतीला धावली तरुणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:20+5:302021-05-29T04:16:20+5:30
सुशिला आनंद गिरवानी असे या निराधार महिलेचे नाव आहे. ती पती आनंद गिरवानी यांच्यासोबत उदरनिर्वाहासाठी १५ वर्षांपूर्वी औराद शहाजानी ...

निराधार महिलेच्या मदतीला धावली तरुणाई
सुशिला आनंद गिरवानी असे या निराधार महिलेचे नाव आहे. ती पती आनंद गिरवानी यांच्यासोबत उदरनिर्वाहासाठी १५ वर्षांपूर्वी औराद शहाजानी येथे आली. दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असत. दरम्यान, ८ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आणि तिने आयुष्याचा साथीदार कायमस्वरुपी गमावला. त्यामुळे त्या धुणीभांडी करून उदरनिर्वाह करीत होत्या.
परंतु, गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. त्यातून त्या कशीबशी गुजराण करीत असत. शेजारी कुटुंबांनीही आपला शेजार धर्म पाळत त्यांना दोन वेळचे जेवण दिले. मात्र, तीन महिन्यांपासून ती खूपच आजारी पडली होती. कोरोनाच्या भीतीमुळे तिच्याजवळ कोणीही जात नव्हते. ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिद्दीक मुल्ला यांना समजताच त्यांनी स्वतः पुढे येत डॉ. गौस शेख यांना बोलावून त्या महिलेवर उपचार सुरू केले.
कोरोना चाचणी केली आणि ती निगेटिव्ह आली. डॉ. गौस यांनी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून त्या महिलेला तिथे उपचारासाठी दाखल केले. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी वाहनाची व्यवस्था केली. त्यानंतर डाॅक्टरांना सदर महिलेच्या अडचणी सांगितल्या. उपचारानंतर त्या ८ ते १० दिवसांत पूर्ण बऱ्या झाल्याने त्यांना पुन्हा औरादला सिद्दीक मुल्ला यांनी आणले आणि त्यांच्या राहण्याची व भोजनाची स्वत: आणि शेजाऱ्यांकडून व्यवस्था केली.
स्वत:च्या आईप्रमाणे केली सेवा...
अशा कठीण काळात शेजारी महिला रुक्साना शेख, मालनबी शेख, आशाबाई हणमंते, सुरेखा कांबळे, शिल्पा घंटे यांनी आपल्या स्वत:च्या आईप्रमाणे अंघोळ, जेवण, कपडे बदलणे, वेळेवर औषध देणे आदी केले. या सर्वांच्या परिश्रमामुळे त्या ठणठणीत झाल्या आहेत. त्यांना डॉ. गौस, सिद्दीक मुल्ला व त्यांचे सहकारी सुनील सांडवे, इबु कुरेशी, अहमद मुल्ला, सतीश कांबळे, केरबा आमले, माणिक पांचाळ, प्रशांत मेहेत्रे, अयुब शेख, असलम शेख, अब्रार पटेल, फेरोज निटुरे आदींनी सहकार्य केल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले.