दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकलेचे गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:40+5:302021-06-18T04:14:40+5:30
लातूर : दहावी बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांना चित्रकला विषयातील वाढीव गुण देण्यात येतात. कोरोनामुळे यावर्षी इलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षा घेण्यात ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार चित्रकलेचे गुण
लातूर : दहावी बोर्ड परीक्षेतील विद्यार्थ्यांना चित्रकला विषयातील वाढीव गुण देण्यात येतात. कोरोनामुळे यावर्षी इलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गुण देता येणार नाहीत, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र, शिक्षकांच्या मागणीनुसार एलिमेंटरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कलेचे गुण द्यावेत, याबाबत पत्र काढले आहे. इलिमेंटरी परीक्षेसाठी इयत्ता सातवीपासून विद्यार्थी पात्र ठरतात. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी ते नववीपर्यंत परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तर काही विद्यार्थी इंटरमीजिएट परीक्षा न झाल्यामुळे गुणांपासून वंचित राहणार होते. त्यामुळे इलिमेंटरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. चित्रकलेची इलिमेंटरी व इंटरमीजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना व इलिमेंटरी परीक्षा १ उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वाढीव गुण मिळणार आहेत.
ग्रेडनुसार मिळणार गुण...
ए ग्रेडसाठी ७, बी ग्रेडसाठी ५ तर सी ग्रेडसाठी ३ गुण दिले जातात. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाकडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. या निर्णयाचे जिल्हाध्यक्ष अशोक तोगरे, पद्माकर वाघमारे, अमोल देवकते, बाबुराव भोसले, पी. आर. पाटील, एम. एच. कादरी, दादा भगाटे, नरेंद्र बारई, हिरामण पाटील आदींनी स्वागत केले आहे.