सलग दोन हंगाम गेल्याने कुस्तीगीर हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:53+5:302021-04-16T04:18:53+5:30

महेश पाळणे, लातूर : कुस्तीच्या आखाड्यातून आपले कौशल्य दाखवित अनेक मल्ल मैदान गाजवतात. या मैदानातून मिळालेली जमापुंजी ते आपल्या ...

The wrestler is heartbroken after two consecutive seasons | सलग दोन हंगाम गेल्याने कुस्तीगीर हवालदिल

सलग दोन हंगाम गेल्याने कुस्तीगीर हवालदिल

महेश पाळणे,

लातूर : कुस्तीच्या आखाड्यातून आपले कौशल्य दाखवित अनेक मल्ल मैदान गाजवतात. या मैदानातून मिळालेली जमापुंजी ते आपल्या खुराकासाठी खर्च करतात. कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीही यात्रा, जत्रांचे आखाडे रंगले नाहीत. यंदाच्या वर्षीही असेच चित्र आहे. त्यामुळे आखड्याबाहेरच कुस्तीगीर ‘चितपट’ झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्याला कुस्तीची परंपरा आहे. जिल्ह्यातील रुई रामेश्वर, रामलिंग मुदगड, अलमला, उदगीर, जळकोट, शिवणी, भुसनी व लातूरसह जिल्ह्यातील अनेक गावात कुस्तीगिरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व तालमीत जवळपास दोन ते अडीच हजार मल्ल दैनंदिन सराव करतात. जत्रा, यात्रांच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धेतून ते आपली उपजीविका भागवितात. कोरोनामुळे गेल्या वर्षी व यंदाच्या वर्षी आखाडे रंगले नाहीत. त्यामुळे पैलवान कसा जगणार असा प्रश्न कुस्ती क्षेत्रात पडला आहे. जिल्ह्यात रुई रामेश्वर, सिद्धेश्वर यात्रा, खाडगावचा उरूस, खंडोबा यात्रा, हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडवा आदी सणासह अनेक छोट्या-मोठ्या गावात कुस्त्यांची दंगल होते. सलग दीड वर्ष झाले त्यामुळे यात्रातील आखाडे बंद आहेत. या कारणाने कुस्तीगिरांचे आर्थिक स्रोत बंद पडले आहेत. परिणामी, कुस्तीगीर आर्थिक संकटात सापडले आहे. एकतर सराव नसल्याने अंगाला अंग लागत नाही. त्यातच स्पर्धाही नसल्याने कुस्तीगिरांसमोर इकडे आड तिकडे विहीर असा पेच निर्माण झाला आहे. खुराकासाठी घरच्यांच्या समोर किती वेळा हात पसरावे याचीही मल्लांना धास्ती लागली आहे. राज्य सरकारने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे कुस्तीगिरांतून बोलले जात आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर कोरोनाचे सावट...

कोरोनामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी होणार असा प्रश्न कुस्तीगिरांना पडला आहे. गतवर्षी उपविजेता ठरलेला लातूरचा शैलेश शेळके यंदाच्या स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. मात्र, कोरोनामुळे ही स्पर्धा कधी होणार याची धास्ती जिल्ह्यातील मल्लांना लागली आहे.

खुराकासाठी महिन्याला २० हजार...

शिवछत्रपती पुरस्कार विजेता ज्ञानेश्वर गोचडे म्हणाला, एका मल्लाला महिन्यासाठी कुस्तीचा सराव व खुराकासाठी साधारण २० हजार रुपयांचा खर्च येतो. यात्रेतील मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून गरीब पैलवान हा खर्च भागवितात. काही मल्ल तर यावरच विसंबून आहेत. मात्र, स्पर्धा होत नसल्याने अडचण आहे. शासनाने पैलवानांना मानधन द्यावे.

स्पर्धा नसल्याने आर्थिक अडचण...

कोरोनाच्या महामारीमुळे कुस्ती स्पर्धेचा दुसरा सिझनही जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. आयपीएलची स्पर्धा होते मात्र कुस्तीचे आखाडे होत नाहीत. प्रेक्षकांशिवाय कुस्ती व्हावी, असे राष्ट्रीय कुस्तीपटू पंकज पवार यानी सांगितले.

मल्लांना आर्थिक मदत करावी...

कोरोनाच्या संकटामुळे कुस्तीचे आखाडे रद्द होत आहेत. त्यामुळे कुस्तीगीर अडचणीत आहेत. ग्रामस्थांनी आपल्या गावातील मल्लांना आर्थिक आधार द्यावा. यासह जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व कंपन्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील गरजवंत मल्लांना आर्थिक हातभार द्यावा, असे कुस्ती प्रशिक्षक मुकरम बंडे म्हणाले.

Web Title: The wrestler is heartbroken after two consecutive seasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.