लस आरक्षणात जग पुढे, आपण मागे; केंद्र सरकारचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:33+5:302021-05-31T04:15:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनावरील लस बाजारात येण्यापूर्वी जगातील अनेक देशांनी लस उत्पादक कंपन्यांकडे आरक्षण करून ठेवले. त्यामुळे ...

लस आरक्षणात जग पुढे, आपण मागे; केंद्र सरकारचे अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनावरील लस बाजारात येण्यापूर्वी जगातील अनेक देशांनी लस उत्पादक कंपन्यांकडे आरक्षण करून ठेवले. त्यामुळे लस आरक्षणात जग पुढे आणि आपण मागे, अशी स्थिती असून, केंद्र सरकारने जनतेच्या जीवाशी खेळ चालवला आहे, असा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
केंद्र सरकारचा ७ वर्षांचा लेखाजोखा निराशाजनक असल्याचे नमूद करून देशमुख म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी मास्क आणि लस हाच पर्याय आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी लस उत्पादक कंपन्यांशी संवाद साधून लसीचे डोस आरक्षित केले. आता त्या सर्व कंपन्या जगाला लस पुरवतील आणि नंतर भारताकडे वळतील. केंद्र सरकार लसीचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले. महामारीच्या काळात राजकारण करायचे नाही. परंतु, कोरोना लढ्यात केंद्र सरकार गंभीर नाही. पीएम केअर योजनेतून ज्या व्हेंटिलेटरचा पुरवठा केला आहे, त्यातील २५ टक्के व्हेंटिलेटर बिघडलेले आहेत. सर्व देशात ही स्थिती आहे. पटना, चंदीगढ, बंगाल, कलकत्ता, बेंगलोर, हैद्राबाद आदी ठिकाणी आलेल्या व्हेंटिलेटरमध्येही बिघाड आहे. या व्हेंटिलेटरची दुरूस्ती करावी अथवा बदलून द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
सध्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला स्थगिती आहे. हा जनतेच्या जीवाशी खेळ नाही का, असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार धीरज देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव उपस्थित होते.
हाफकीनमार्फत स्वतंत्र लसीसाठी संशोधन...
हाफकीनमार्फत स्वतंत्र लसीचे संशोधन करून लस निर्मितीची राज्य शासनाची तयारी आहे. शिवाय, बाजारात उपलब्ध लसीचे उत्पादन करण्यासाठीही हाफकीनने परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले.