उदगीरच्या साहित्यिक सखी ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:31+5:302021-08-26T04:22:31+5:30

ग्रुपच्या लेखिकांच्या वैयक्तिक व संपादित नऊ पुस्तकांचा एकत्रित प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विजया क्षीरसागर होत्या. उदगीरच्या साहित्यिक ...

The work of Udgir's Literary Sakhi Group is commendable | उदगीरच्या साहित्यिक सखी ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

उदगीरच्या साहित्यिक सखी ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

ग्रुपच्या लेखिकांच्या वैयक्तिक व संपादित नऊ पुस्तकांचा एकत्रित प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी विजया क्षीरसागर होत्या. उदगीरच्या साहित्यिक सखी ग्रुपच्या प्रा. अश्विनी निवर्गी, अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार, प्रा. अश्विनी देशमुख, उषाताई तोंडचिरकर यांचा कोष हा कविता संग्रह, शब्दातीत अती लघुकथा संग्रह व कथा रंग हा कथासंग्रह तर अर्चना नळगीरकर यांचा काव्यार्चन हा कवितासंग्रह, मंजरी मार्लेगावकर औरंगाबाद यांचा काव्यतुरा हा कवितासंग्रह व क्षमा वाखारकर मुंबई यांचा मला भेटले नव्याने हा चारोळी संग्रह तसेच साहित्यिक सखी ग्रुपच्या संपादित तीन पुस्तकांचे तिच्या लेखणीतून हा कथासंग्रह व ओंजळ कवितांची भाग १ व भाग २ या कविता संग्रहाचे तसेच ३५ ई-बुक्सचे प्रकाशन झाले. या ग्रुपमध्ये भारतातील २०० लेखिका असून त्या सातत्याने लेखन करीत आहेत. उषाताई तोंडचिरकर यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक सुनंदा सरदार यांनी केले. अर्चना नळगीरकर यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी निवर्गी यांनीही याप्रसंगी आपल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचा प्रवास सांगितला. मंजरी मार्लेगावकर यांनीही मनोगत व्यक्त करताना अनेक कविता व गझल सादर केल्या. सायली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. पुष्पा चपळगावकर व शोभा मारलेगावकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

विजया क्षीरसागर म्हणाल्या, साहित्यिक सखी ग्रुपची प्रत्येक आयोजक सखी आपल्या स्वतंत्र कलागुणांनी या ग्रुपच्या वैभवात भर टाकत आहे. महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेले महिलांचे व्यासपीठ म्हणजेच साहित्यिक सखी ग्रुप. आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या महिलांच्या आयुष्यात साहित्याचा आनंद ही चळवळ निर्माण करीत आहे, असेही त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा पांडे, नागपूर यांनी केले. आभार अपर्णा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास मेजर एस.पी. कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, पूजा कुलकर्णी, प्रा.डॉ. महेश निवर्गी, गोपाळकृष्ण नळगीरकर, प्रसन्न मार्लेगावकर, भूषण क्षीरसागर, प्रेम कुलकर्णी, सागर कुलकर्णी, उषाताई कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

Web Title: The work of Udgir's Literary Sakhi Group is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.