उदगीर बसस्थानकाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:32+5:302021-01-03T04:20:32+5:30
लातूर/ उदगीर : शहरातील नांदेड-बीदर महामार्गालगत गत ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, ती ...

उदगीर बसस्थानकाचे काम रखडले
लातूर/ उदगीर : शहरातील नांदेड-बीदर महामार्गालगत गत ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, ती माेडकळीस आली आहे. धाेकादायक इमारतीत हजाराे प्रवासी आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. प्रवेशद्वाराचे छत काेसळण्याची भीती आहे. मंजूर असलेल्या बसस्थानकाचे काम गत दीड वर्षांपासून रखडले असून यासाठी तब्बल दहा लाखांचा निधी दाेन टप्प्यांत मंजूर करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उदगीर येथील बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली आहे. या इमारतीचे पाडकाम करून नव्याने येथे अत्याधुनिक साेयी-सुविधांनी युक्त असे बसस्थानक उभारण्यास गत दाेन वर्षांपूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या बसस्थानकाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. पुन्हा यामध्ये फरफार करण्यात आला. त्यानुसार मंजूर निधीला दाेन टप्प्यांची कात्री लावण्यात आली. एवढा साेपस्कार पूर्ण हाेवूनही बसस्थानकाचा प्रश्न मात्र गत दाेन वर्षांपासून मार्गी लागला नाही. गत फेब्रुवारीत या बसस्थानकाचे काम सुरू करण्यात येणार हाेते. संबंधित गुत्तेदाराने पर्यायी व्यवस्था म्हणून पत्राचे शेडही उभारले हाेते. मात्र, बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला नाही.
२०१८ मध्येच मिळाली निधीला मंजुरी...
जानेवारी २०१८ मध्येच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जवळपास दहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह आधुनिक पद्धतीच्या बसस्थानकाचा मास्टर प्लॅन शासनाकडे सादर केला हाेता. मात्र, ताे कागदावरच राहिला. बसस्थानकाची जुनी इमारत मोडकळीस आली असून, येथून ये-जा करणाऱ्या हजाराे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच बसस्थानक परिसरात सिमेंट अथवा डांबरीकरण नसल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. शौचालयाच्या आऊटलेटच्या पाईपलाईनला गळती लागल्याने दुर्गंधी पसरली आहे.
परिसरात सर्वत्र घाणीचे सम्राज्य...
बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरल्याने प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्याचबराेबर बसस्थानकाचे छताचा गिलावा काेसळत आहे. परिणामी, स्लॅबच्या सळया उघड्या पडल्या आहेत. पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यावर छतातून पाणी टपकते. रखडलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांसह उदगीर येथील नागरिकांतून हाेत आहे.