अहमदपूर तालुक्यातील ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:40+5:302021-05-20T04:20:40+5:30
अहमदपूर तालुक्यात सिंचन विहिरींचे १०९ प्रस्ताव मंजूर झाले असून, ५९ प्रस्तावांचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, पावसाळा ...

अहमदपूर तालुक्यातील ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश रखडले
अहमदपूर तालुक्यात सिंचन विहिरींचे १०९ प्रस्ताव मंजूर झाले असून, ५९ प्रस्तावांचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापपर्यंत ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. ऑनलाईन व ऑफलाईन सर्व व्यवहार सुरू असताना कार्यारंभ आदेश देऊन शेतकऱ्यांना पत्र देण्याचे शिल्लक असतानाही कोरोनाचे कारण दाखवित हे कार्यारंभ आदेश थांबल्याचे दिसून येत आहे.
कार्यारंभ आदेश दिलेली गावे आणि विहिरींची संख्या : चिखली ५, टाकळगाव ३, ढाळेगाव ५, नांदुरा खु. ५, आंबेगाव २, मावलगाव ५, काळेगाव ५, शिवनखेड ५, लांजी येथे ३ विहिरींच्या कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या प्रत्येक लाभार्थीस विहीर खोदकामासाठी ३ लाखांचे अनुदान असून, त्यातील १ लाख ८४ हजार मजुरांच्या नावावर त्यांच्या कामानुसार जमा होतात. तसेच कुशल कामगारांचे १ लाख १६ हजार लाभार्थींच्या अथवा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात येतात. आतापर्यंत १३७ विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत, असे पंचायत समितीकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांकडून पाठपुरावा...
तालुक्यात ५० सिंचन विहिरींचे कार्यारंभ आदेश गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळाले नाहीत. त्यात सोरा ५, आनंदवाडी ५, केंद्रेवाडी १०, वळसंगी १०, कोपरा १०, उन्नी ५ अशा सात गावांतील ५० विहिरींचे कार्यारंभ आदेश शिल्लक आहेत.
शेतकऱ्यांची अडचण...
पावसाळ्यापूर्वी कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे. सिंचन विहीर मंजुरीचे सर्व अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रस्ताव समोर येऊनही गटविकास अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.
लवकरच कार्यारंभ आदेश...
आतापर्यंत मंजूर १३७ विहिरींची कामे चालू झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात १०९ सिंचन विहिरी मंजूर करण्यासंबंधीचे प्रस्ताव आले आहेत. त्यातील ५९ प्रस्ताव मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. उर्वरित ५० विहिरींचे कार्यारंभ लवकरच देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड यांनी सांगितले.