इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:30+5:302021-07-10T04:14:30+5:30
लातूर : स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलची इंधन दरवाढ आणि डाळ, खाद्यतेल या जीवनावश्यक वस्तूंची महागाई केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ...

इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेसची निदर्शने
लातूर : स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, डिझेलची इंधन दरवाढ आणि डाळ, खाद्यतेल या जीवनावश्यक वस्तूंची महागाई केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. या महागाईविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने आंदोलनाची हाक दिली आहे. या अनुषंगाने लातूर शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष प्रा. स्मिता खानापुरे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुनीता आरळीकर, महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या सचिव सपना किसवे यांच्या पुढाकारातून ही निदर्शने करण्यात आली. वाढती महागाई तत्काळ मागे घ्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅस, पेट्रोल, डिझेल हा सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. डिझेलचे दर वाढल्यास वाहतुकीचा खर्च वाढतो. एकूणच सर्व वस्तूंच्या किमती वाढतात. ही दरवाढ सामान्यांना परवडणारी नाही. घरखर्चाचे गणित बिघडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात स्वयंप्रभा पाटील, केशरबाई महापुरे, लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शोभा ओव्हाळ, अनिता क्षीरसागर, फरजाना शेख, नयना ईरबतनवाड, मीना टेकाळे, सुलेखा कारेपूरकर, कमलबाई मिटकरी, लक्ष्मीबाई बटनपूरकर, साहेरा पठाण, अनिता कांबळे, मंदाकिनी सिरवटे, दीप्ती खंडागळे, वर्षा मस्के, मीना लोखंडे, रुबीन तांबोळी, गौरवी बागवान, शैलजा आराध्ये, सुनंदा इंगळे, योजना कामेगावकर, दैवशाला राजमाने, सरिता जगताप, मिनाक्षी शेटे, सीमा क्षीरसागर, सुरेखा गायकवाड, पूजा इगे, इंदूताई इगे, संगीता पतंगे आदींचा सहभाग होता.
महिला काँग्रेसची भेट
गॅसची दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा निषेध महिला काँग्रेसने केला. ही दरवाढ मागे घेण्याचे निवेदन देताना निवेदनासोबत शेणाची गोवरी भेट देण्यात आली. महागाई कमी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.