उदगीर (जि. लातूर) : माहेरून पैसे घेऊन ये म्हणून, मानसिक व शारीरिक छळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने चपातीमध्ये विषारी औषध घालून ताेंडात कोंबले. नाक दाबून जबरदस्तीने ती गिळण्यास भाग पाडल्याची घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उदगीर येथे घडली. याबाबत विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात रविवारी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील जळकोटरोड परिसरातील आझादनगर येथे वास्तव्याला असलेली फिर्यादी महिला अफसा नवीद शेख (वय २४) यांना आरोपींनी संगनमत करून माहेरून पैसे घेऊन ये म्हणून, मानसिक छळ केला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जीवे मारण्याच्या उद्देशाने चपातीमध्ये विषारी औषध टाकून फिर्यादीचे हात-पाय धरले. त्यानंतर तिच्या ताेंडात जबरदस्तीने विषारी चपाती काेंबली.तिचे नाक दाबले आणि चपाती गिळण्याला भाग पाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा आशयाची फिर्याद दिल्याने फरीद आरिफ शेख, शाहिदा फरीद शेख, रहिमुनीसा अताउर रहमान शेख, आरिफ शेख (सर्व रा. जळकोट रोड, उदगीर) या चाैघांविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात कलम १०९, ८५, ३५२ भारतीय न्याय संहितानुसार रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.